गोपाळकाला मुंबईतील व मुंबईच्या आसपास असणाऱ्या शहरांमधील गोविंदांसाठी व गोविंदा पथकांसाठी अत्यंत उत्साहाचा सण मानला जातो. मात्र यंदाचा दहीहंडी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मुंबईतील व मुंबईबाहेरील मोठमोठ्या दहीहंडी आयोजकांनी यंदा त्यांची दहीहंडी रद्द केली. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी दिसणारे गोविंदा यंदा मात्र दिसले नाहीत.मुंबई : सर्व गोविंदा पथके दरवर्षी आपल्या पथकाचे टी-शर्ट घालून बस, टेम्पो, ट्रक व दुचाकीवरून मानवी थर रचण्यास घराबाहेर पडलेले पाहायला मिळतात. मात्र यंदा या गोविंदांनी स्वयंशिस्त राखत आपल्या घरीच राहणे पसंत केले. मुंबईतील अनेक चाळींमध्ये तसेच मंडळाच्या जागेत गोविंदांनी जागेवाल्याची पूजा करून कोरोनाचे संकट दूर करण्याचे गाºहाणे घातले. मानवी मनोरे रचण्याची संधी गोविंदा पथकांना मिळाली नसली तरीही मुंबईत काही ठिकाणी एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखत खालीच हंडी फोडण्यात आली, तसेच श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. यावेळी मुंबईच्या रस्त्यांवर मास्क घातलेले छोटे श्रीकृष्णही पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील पहिले दृष्टिहीन मुलामुलींचे गोविंदा पथक अशी ख्याती असणाºया नयन फाउंडेशनच्या गोविंदांनी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयासमोर असणाºया मैदानात जागेवाल्याला नारळ देत गाºहाणे घातले आणि पुढच्या वर्षी अधिक उत्साहात गोपाळकाला उत्सव साजरा करू असे सांगितले. कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द झाला असला तरीही दृष्टिहीन गोविंदांचा उत्साह मात्र दरवर्षीप्रमाणेच आहे. असे नयन फाउंडेशनचे अध्यक्ष पोन्नलगर देवेंद्र यांनी सांगितले.चिंचपोकळी येथील केरमाणी इमारतीतही साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. येथील गोविंदांनी तोंडाला मास्क बांधून दोन थरांची हंडी फोडली. दादर आणि वरळी येथील बीडीडी चाळींमध्येही काही मंडळांनी छोट्या स्वरूपात गोपाळकाला उत्सव साजरा केला. चेंबूरच्या लालडोंगर येथील गोविंदांनी सामाजिक अंतर राखत दहीहंडी उत्सव साजरा केला, तसेच श्रीकृष्णाची पूजा केली. यंदा दहीहंडी उत्सव रद्द झाला असल्याने खूप वाईट वाटत असल्याचे एका बालगोविंदाने सांगितले. मुंबईतील काही महिला गोविंदा पथकांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळत दहीहंडी फोडली व सर्वांचा उत्साह द्विगुणित केला. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात दहीहंडी उत्सवांचे आयोजक मोठ्या रकमांचे बक्षीस ठेवून गोविंदा पथकांना आकर्षित करतात. मात्र यंदा संपूर्ण मुंबईत व आजूबाजूच्या शहरांमध्ये शुकशुकाट होता.
यंदा घागर उताणीच; दहीहंडीला कोरोनाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 1:44 AM