मुंबई : दिवसागणिक राज्यभरात दोनशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा होत, ३ पोलिसांचा मृत्यू होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तब्बल ३८१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यन्तचा हा सर्वाधिक आकडा आहे. ऑगस्ट महिन्यापासून गेल्या ११ दिवसांत २ हजार ५५६ पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकले. तर २२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यूचा आकडा १२४ वर गेला आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसह कोविड रुग्णालयाभोवती बंदोबस्त, दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. अनलॉकच्या काळात राहदारी वाढली. नागरिकांशी संपर्क वाढल्याने पोलिसांभोवतीचे संकटही वाढताना दिसत आहे. राज्यभरात १३ ऑगस्ट पर्यन्त ११ हजार ७७३ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात १ हजार २२१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ९३२ अधिकाऱ्यांसह ९ हजार ४१६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांभोवतीचा कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे. यात गेल्या २४ तासांत तब्बल ३८१ पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकले. गेल्या दोन दिवसांत एकूण ६७५ पोलिसांना बाधा झाली आहे. सध्या २ हजार २३३ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या २४ तासांत तीन पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे मृत्यूचा आकडा १२४ वर पोहचला आहे. जून महिन्याच्या अखेरीस कमी झालेल्या आकड्याने अनलॉकच्या टप्प्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यापासून यात आणखीन भर पडताना दिसत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.