Join us

आंब्यावरील कोरोना संकट टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:02 PM

कोकणचा राजा थेट गृहनिर्माण संकुलांत, तीन दिवसांत ३२ हजार डझन आंब्याची आवक, सिंधुदूर्ग रत्नागिरीतल्या शेतक-यांना मोठा दिलासा

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे आंब्याचा हंगामही धोक्यात आला असला तरी शेतातून थेट सोसायट्यांमध्ये आंबा दाखल करण्याच्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातून तब्बल ३२ हजार डझन आंबा शहरी भागातल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दाखल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या आंब्याचे दर किमान २५ ते ३० टक्क्यांनी कमी असून ग्राहक आणि आंबा उत्पादकांचाही त्यातून फायदा होत आहे. 

लॉकडाऊनमुळे आंब्याला भाव मिळणार नाही त्यामुळे एपीएमसीत आंबा पाठवू नका अशा सुचना बाजारातून मिळू लागल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले होते. कोकणातील शेतक-याचे आंबा हे एकमेव नगदी पिक आहे. ऐन हंगामात कोसळलेल्या या संकटामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची भीती होती. त्यामुळे रत्नागिरी कृषी विभागाने उपनिबंधक कार्यालयाच्या (डीडीआर) सहकार्याने थेट सोसायट्यांमध्ये आंबा विक्रीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. राज्यातील डीडीआर कार्यालयांनी अनेक सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सचिवांना थेट आंबा खरेदीसाठी आवाहन केले होते. तर, कृषी विभागाने सिधूदुर्ग रत्नागिरीतून आंबा पाठविण्यासाठी आवश्यक नियोजन केले. सोसायटीने त्यांच्या मागणीनुसार एकत्रित आंब्याची आॅर्डर शेतक-यांना द्यायची. शेतक-यांनी तो आंबा सोसायटीपर्यंत पोहचवायचा आणि सोसायटीने थेट शेतक-यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा करायचे अशी ही योजना आहे. आम्ही त्या दोघांमधला दूवा म्हणून कार्यरत असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक विकास पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या आठवड्याभरात हजारो डझन आंबा घराघरांत दाखल होईल. त्यातून आंबा उत्पादक शेतक-यांवरील संकट टळेल असा विश्वासही कृषी अधिका-यांनी व्यक्त केला. 

किंमत किमान २५ टक्क्यांनी कमी 

ठाण्यातील दोस्ती विहार या गृहसंकुलात शुक्रवारी तब्बल तीन हजार डझन म्हणजेच ७५० पेट्या आंबा दाखल झाला. प्रत्येक पेटित साधारणत: २२५ ते २५० ग्रॅम वजनाचा एक याप्रमाणे चार डझन आंबा आहे. त्याचा दर ३५० रुपये आहे. कोरोनाचे संकट नसते तर हाच आंबा ग्राहकांना किमान ५०० ते ५५० रुपयांना मिळाला असता. मात्र, या उपक्रमामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांचाही फायदा  झाल्याचे दोस्ती विहार फेडरेशनचे राजेंद्र देशमुख आणि गिरीश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच, या कठिण काळात शेतक-यांना मदतीचा हात देणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :आंबाकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस