कोरोनाच्या संकटाने गाव गाठले, पण पुन्हा खुणावते मुंबईच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:05 AM2021-05-30T04:05:47+5:302021-05-30T04:05:47+5:30

निखिल सावंत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे संकट कमी होण्याची काही चिन्हे नाहीत. तशात, सरकारने निर्बंध आणखी १५ ...

The Corona crisis reached the village, but again marks Mumbai | कोरोनाच्या संकटाने गाव गाठले, पण पुन्हा खुणावते मुंबईच

कोरोनाच्या संकटाने गाव गाठले, पण पुन्हा खुणावते मुंबईच

Next

निखिल सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे संकट कमी होण्याची काही चिन्हे नाहीत. तशात, सरकारने निर्बंध आणखी १५ दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बंधांमुळे मुंबई सुटली आहे. सोयीचे म्हणून अनेकांनी गाव गाठले, पण आता त्यांना पुन्हा मुंबई खुणावू लागली आहे. पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा तर मुंबईला पर्याय नाही, असे म्हणत काही मंडळी मुंबईच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत.

मुंबईतील नोकरी गेल्याने गावाकडे परतलेल्या तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरखर्च चालविण्यासाठी पैसे नाहीत. उधार घेऊन शेतीसाठी भांडवल उभे करतो आणि त्यातच कसाबसा कुटुंबाचा खर्च भागवतो आहे. नोकरी होती तेव्हा कसेतरी भागत होते. पण सगळे बंद झाल्यामुळे घरभाडे, वीजबिल कसे द्यायचे, हा मोठाच प्रश्न आहे. आता भविष्याची चिंता सतावते आणि कधी एकदा मुंबईला परततो, असे झाले आहे. मुंबईतून कोरेगाव तालुक्यातील अंबवडे या गावी आलेल्या नवनाथ सकुंडे यांनी त्यांची व्यथा मांडली.

नवनाथ सकुंडे हे जाहिरात क्षेत्रात काम करत होते. मात्र, नव्याने लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते पुन्हा गावी परतले. लॉकडाऊनमुळे कंपनीला तोटा झाला. त्यामुळे आम्हाला कामावरून काढून टाकले. आता मी शेती करतो आहे. पैसे नसल्यामुळे कर्ज काढून शेतीसाठी पैसे उभे केले. निर्बंध शिथील झाले की, लगेच मुंबईत जाऊन पुन्हा एकदा काम शोधण्यासाठी वणवण करावी लागेल. शेतीतून जे काही थोडेबहुत मिळते आहे, त्यातून मुंबईतील खोलीचे भाडे भरत आहे, असे सकुंडे सांगतात.

लॉकडाऊनमुळे सगळी दुकाने, कामधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लातूर, सातारा, बीड आदी भागातील सर्व कामगार हे घरी परतले. काही आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत, त्यांना घरून काम करण्याचा पर्याय आहे. पण पुरेशी वीज न मिळणे, नेटवर्कची समस्या त्यांना भेडसावत आहे. गणेश खामकर हे त्यापैकीच एक. खामकर काही दिवसांपूर्वीच गावी परतले. मात्र, गावी आल्यावर वेगळ्याच समस्या मांडलेल्या होत्या. मुख्यत्वे विजेची समस्या. त्यावर तोडगा काय तर... जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मुंबईला परतणे, असे खामकर म्हणाले.

कोरेगावच्याच खामकरवाडीत राहणारे मयूर सावंत मुंबईत एका मॉलमध्ये काम करत होते. मॉल बंद झाल्याने लगोलग गावी आले. सध्या घरीच शेती करत आहेत. घरच्या शेतीवर सगळा आर्थिक भार आला आहे. आणखी काही दिवस असेच सुरू राहिले तर मात्र हा आर्थिक ताण असह्य होऊ शकतो. त्यामुळे कधी एकदा लॉकडाऊन उठतो आणि मुंबई पुन्हा पहिल्यासारखी सुरू होते, याकडेच माझे लक्ष लागलेले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

Web Title: The Corona crisis reached the village, but again marks Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.