कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक ठिकाणी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:07 AM2021-05-13T04:07:25+5:302021-05-13T04:07:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

Corona crisis testing market; Loot in many places | कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक ठिकाणी लूट

कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक ठिकाणी लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची काळजी घेत आहेत. मात्र, या संकटाच्या परिस्थितीत अनेक जण संधीचा गैरफायदा घेत आहेत. हल्ली साधा ताप आला, तरी डॉक्टरांकडून रक्त चाचणी, युरीन चाचणी अशा प्रकारच्या विविध चाचण्या करायला सांगितल्या जातात. मात्र, या चाचण्या करायला गेल्यावर पॅथॉलॉजीमध्ये अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक लॅबमध्ये केल्या जाणाऱ्या विविध चाचण्यांचे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत. यामुळे एखाद्या चाचणीचा नेमका दर काय, याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या काळातही लोकांना लुटणाऱ्या पथोलॉजी लॅबवर कोणाचे, नियंत्रण आहे की नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

* चाचण्या आणि दर चाचणी (रुपयांमध्ये)

लॅब १ लॅब २ लॅब ३

अँटिजन - ५०० / ६०० / ८००

आरटीपीसीआर - ७५० / ६०० / ७००

सीबीसी - ३०० / ४०० / ३५०

सीआरपी- ५०० / ४०० / ३७०

डी-डायमर - ९०० / ७५० / ८००

एलएफटी - ४५० / ३९० / ४००

केएफटी - ५०० / ४०० / ३००

* एजंटची टकक्केवारी वेगळीच

अनेकदा पॅथॉलॉजीमध्ये चाचणी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना हेरण्यासाठी अनेक ठिकाणी एजंट दिसतात, तर काही वेळेस स्वतः डॉक्‍टरही एजंट असल्यासारखे वागतात. तुम्ही अमुक एका पॅथॉलॉजीमधूनच चाचणी अहवाल आणा किंवा अमुक एका पॅथॉलॉजीमध्येच चांगली चाचणी केली जाते, असे सांगण्यात येते. प्रत्येक चाचणीमागे डॉक्टर किंवा एजंटचेही कमिशन ठरलेले असते. यामुळे पॅथॉलॉजीमध्ये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांची अक्षरशः लूट होते.

* यांच्यावर नियंत्रण कोणाचे?

एखाद्या परिसरात विविध पॅथॉलॉजीमध्ये एकाच चाचणीसाठी वेगवेगळे दर आकारले जातात. यामुळे कोणत्या पॅथॉलॉजीमध्ये चांगल्या प्रकारे चाचणी होऊ शकते, याबाबत नागरिक गोंधळून जातात. परिणामी, ज्या लॅबमध्ये जास्त दर आकारला जातो, तिथे चाचणी चांगली होत असेल, असा समज नागरिकांचा होतो. त्यामुळे हे दर वेगवेगळे आकारणाऱ्या लॅबवर कोणाचे नियंत्रण आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

.......................................

Web Title: Corona crisis testing market; Loot in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.