मुंबई - राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका ओळखून राज्यात 15 दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यानुसार, 22 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावरुन मनसेनं कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू केल्याचं म्हटलंय. मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विटरवरुन सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील नाईट कर्फ्यूदरम्यान 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. रात्री 11 पर्यंत कोणताही नियम बदललेला नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध असणार आहे, असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी जाहीर केलंय. राज्य सरकार आणि महापालिकेच्या या निर्णयानंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी ट्विट करुन म्हटले होते की, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं नेमकं कारण काय आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं. मग लोकांना बंधन का, असा सवाल उपस्थित करत कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकताच साजरा झाला. त्या पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्रीसुद्धा सहकुटुंब उपस्थित होते. कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही. मात्र सामान्य जनतेच्या पार्ट्यांमध्ये तो हमखास येतो. मुंबईकर नव्हे, पण हा कोरोना खूप डॅम्बिस आहे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला होता. आता, पुन्हा एकदा सरकारवर अप्रत्यक्ष टीका केलीय.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात 22 डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
हॉटेल व्यावसायिक नाराज
राज्य सरकारच्या निर्णयामुळे पुणे आणि मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रात्री अकरा ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. कोरोना टाळेबंदीनंतर आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा सरकारने आमच्या व्यवसायावर संक्रांत आणली, अशीच सर्वांची भावना असून कोरोना विषाणू काय रात्रीचाच फिरतो का, असा त्रस्त सवाल हॉटेल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.