मुंबई : मुंबईत मागील ११ दिवसांपासून काेराेनाच्या मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांकडून याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ मे ते ११ दरम्यान मुंबईत ७८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे, म्हणजेच मृत्युदर हा २.५० टक्के आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन मृत्युदरही एक टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आला आहे. परिणामी, मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका प्रशासन राज्य कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणार आहे.पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले होते. शिवाय, अजूनही रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे मृत्यू ओढावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांना खासगी आणि पालिका रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना उपचार पद्धतीच्या प्रोटोकॉलविषयी मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे. उशिराने रुग्णालयात दाखल होणे, सुरुवातीला छोट्या रुग्णालयात उपचार घेऊन प्रकृती अस्वास्थ्यानंतर कोविड रुग्णालय-केंद्रात दाखल होणे हे थांबविले पाहिजे. तसेच, अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती हा संवेदनशील गट असल्याने या रुग्णांकडे प्राधान्याने विशेष लक्ष दिले पाहिजे.
गेल्या आठवड्याभरात ४८९ मृत्यूंची नोंदकोरोना मृत्यूविश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात कोरोना मृत्यूंनी आठवड्याला ३५०चा आकडा ओलांडला नव्हता. मात्र गेल्या आठवड्याभरात ४८९ मृत्यूंची नोंद झाली आहे. काही काळापूर्वी ०.३३ टक्क्यांवर आलेले मृत्यूचे प्रमाण सध्या वाढले आहे. ते कमी करण्यासाठी लवकर रुग्णालयात दाखल होणे, ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा, अतिदक्षता विभागात दर्जात्मक सेवा यांवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.