Join us

पोलिसांतील कोरोना मृत्यूच्या प्रमाणात ७५ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:04 AM

मे महिन्याच्या तुलनेत दिलासा : जूनमध्ये ७७७ जणांना लागण तर १४ जणांचा मृत्यू(पाॅझिटिव्ह स्टोरी)जमीर काझीलोकमत न्यूज ...

मे महिन्याच्या तुलनेत दिलासा : जूनमध्ये ७७७ जणांना लागण तर १४ जणांचा मृत्यू

(पाॅझिटिव्ह स्टोरी)

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसते आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनामुळे झालेल्या पोलिसांच्या मृत्यूच्या प्रमाणात तब्बल ७५ टक्क्यांनी तर ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये ५७ टक्क्यांनी घट झाली आहे. जूनमध्ये ७७७ जणांना लागण झाली तर १४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

या वर्षात पहिल्या ६ महिन्यांत तब्बल १६६ पोलिसांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी मार्चपासून मुंबईसह राज्यभरातील तब्बल ४८४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात ४४ अधिकारी तर ४४० अंमलदारांचा समावेश आहे. मार्च ते ३१ डिसेंबरपर्यंत ३३२ पोलिसांचा या संसर्गामुळे जीव गेला आहे. तर १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत १६६ पोलिसांचा बळी या विषाणूने घेतला. यावर्षी ३१ मार्चपर्यंत २६ जण बळी पडले होते. मात्र, एप्रिल व मे महिन्यात तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये ६४ तर मे महिन्यात ५७ पोलीस मृत्यूमुखी पडले होते. जूनमध्ये हे प्रमाण १४ वर आले आहे.

आतापर्यंत ४४ हजार ७६३ पोलिसांना कोराेनाची लागण झाली आहे. त्यात ५,४०९ अधिकारी व ३९,३५४ अंमलदारांचा समावेश आहे. सध्या ५०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात ७० अधिकारी व ४३५ अंमलदारांचा समावेश आहे.

या वर्षातील कोरोनामुळे पोलिसांच्या झालेल्या मृत्यूची आकडेवारी

महिना - मृत्यू

जानेवारी - १२

फेब्रुवारी - २

मार्च - १३

एप्रिल - ६४

मे - ५६

जून - १४

पोलिसांचेही लसीकरण संथ

कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी पोलिसांचे लसीकरण विविध कारणांनी संथगतीने सुरू आहे. दि. २ जुलैपर्यंत पहिला डोस ९१.५१ टक्के तर दोन्ही डोस केवळ ७२ टक्के जणांनी घेतले आहेत. तसेच नोंदणी केलेल्या १ लाख ९८ हजार ७२२पैकी अद्याप १६,६८१ पोलिसांनी पहिला तर ५५,५११ जणांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. पोलीस महासंचालकांनी त्यासाठी घटक प्रमुखांना सूचना करण्याची आवश्यकता आहे.