मुंबई : कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची द्विशतकपूर्ती झाली असून, ४ विभागात ३०० पेक्षा अधिक तर ११ विभागात २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आहे. या कामगिरीच्या निमित्ताने आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे, मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना यशस्वी होत आहेत. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महानगरपालिकेला निश्चितपणे मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजना वाखाणण्याजोग्या आहेत. इतर शहरे, राज्य, इतर देशांनीही मुंबईचे मॉडेल स्वीकारले आहे. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँकेनेही कौतुक केले. उपाययोजनांना वेग देताना माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, यासाठी जनजागृती करुन भर देण्यात येत आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. आता याचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे.
---------------------
- रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो.
- रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.
- रुग्णसंख्या वाढीचा साप्ताहिक दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक मानले जाते.