मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असल्याने मुंबईतील रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही अनेकांना मास्कचे महत्त्व पटले नसल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांमध्ये तब्बल एक लाख ६० हजार २७९ नागरिकांवर कारवाई करून तीन कोटी ४९ लाख ३४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गुरुवारी दिवसभरात ९,१०७ नागरिक विनामास्क फिरताना आढळून आले.सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न लावणाऱ्या लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल केला जातो. २४ विभागांमध्ये नियुक्त संस्थांचे प्रतिनिधी व पालिका कर्मचारी यांच्याद्वारे ही कारवाई नियमित सुरू आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या माध्यमातूनही कारवाईला सुरुवात करण्यात आली. क्लीन-अप मार्शलची फौज मैदानात उतरवून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अशा कारवाईनंतरही लोकांमध्ये सुधारणा दिसून न आल्यास दंडाची रक्कम दोनशे रुपयांवरून चारशे रुपये करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. मास्क न लावणाऱ्यांना टॅक्सी, बस, कार्यालय, आस्थापना, सोसायटी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्याचा नियम महापालिकेने यापूर्वीच केला आहे. मात्र सर्व प्रकारच्या कारवाईनंतरही अनेक ठिकाणी नागरिक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. गुरुवारी पालिकेच्या पथकाने मास्कचा वापर न करणाऱ्या तब्बल ९,१०७ लोकांना पकडले आणि त्यांच्याकडून १८ लाख २१ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. या आकडेवारीवरून मुंबईकरांना अद्याप मास्कचे महत्त्व पटले नसल्याचेच दिसून येते.
कोरोनाने महापालिकेच्या तिजोरीत जमा केले साडेतीन कोटी ४९ लाख रुपये, विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 1:57 AM