कोरोनामुळे २० ते २५ टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:57 PM2020-08-18T15:57:54+5:302020-08-18T15:59:02+5:30
१०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्य झालेले नाही.
मुंबई : कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षणादरम्यान कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. या दिशेने काम सुरु झाले असले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्य झालेले नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० ते २५ टक्के विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शाळेच्या/शिक्षकांच्या संपर्कात नाहीत. आणि असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असून, ते शिक्षण प्रवाहाबाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी अशा विद्यार्थी मित्रांसाठी आता वेगाने काम सुरु झाले असून, त्यांना कनेक्ट करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने यावर उपाय शोधला आहे. आणि त्यानुसार, आता वर्गनिहाय समिती स्थापन करण्यात येत आहे. या द्वारे संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करत कार्यवाही केली जाईल. या व्यतीरिक्त आणखी एक समिती स्थापन करण्यात येत असून, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सेवा सुविधा आहेत त्यांच्या पालकांनी जवळपासच्या एक दोन विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर पाळत सहकार्य करावे. मोठया वर्गातील विद्यार्थ्यांनी लहान वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करावी. तिसरे म्हणजे पालकांनी एकत्र चर्चा करून एक इयेत्तत असणा-या आपल्या पाल्यांचे गट बनवावेत. आणि अडचणीवर मात करावी, या पध्दतीने कार्यवाही करण्यात येत आहे.
.................................
विद्यार्थी संपर्कात का नाहीत
- काही पालकांकडे अॅन्ड्राइड फोन नाही.
- अॅन्ड्राइड फोन असला तरी नेट पॅक भरण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.
- उपजिविकेचे साधन नसल्याने काही पालक विद्यार्थ्यांसह मूळ गावी विस्थापित झाले आहेत.
- काही पालकांकडे साधा फोन नाही. त्यांचे संपर्क शाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नाहीत.
.................................
आज बैठक
प्रथम या स्वयंसेवी संस्थेमार्फत बुधवारी विविध स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ऑनलाईन शिक्षणापासून जे विद्यार्थी वंचित आहेत; त्यांच्यासाठी काय करता येईल? याबाबत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॉसीचे जगदीश पाटणकर यांनी दिली.