Join us

CoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 2:28 AM

रुग्णसंख्येत घट

मुंबई : फिव्हर क्लिनिक आणि मिशन धारावीच्या माध्यमातून संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर धारावीमध्ये अखेर चांगले परिणाम दिसून येत आहेत. गेले काही दिवस शंभरी पार करणाऱ्या रुग्णांचा आकडा आता या परिसरात कमी होऊ लागला आहे. बुधवारी केवळ १८ रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी ३६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यातून धारावी बाहेर पडत असल्याची चिन्हे आहेत.

आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे होते. त्यानुसार कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन धारावी ही मोहीम सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक रहिवाशांच्या असहकार्याचा सामना महापालिकेला सुरुवातीच्या काळात करावा लागला. सुमारे तीन हजारांहून अधिक डॉक्टर, परिचारिका आणि पालिका कर्मचारी - अधिकारी यांची टीम परिसरात कार्यरत होती.

गेले दोन महिने या विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे पथक दिवसरात्र काम करीत आहे. याचे चांगले परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. मधल्या काळात शंभरपर्यंत पोहोचलेल्या या विभागातील रुग्णसंख्येत आता घट दिसून येत आहे. आतापर्यंत २,७२८ रुग्ण जी उत्तर विभागात आढळून आले आहेत. धारावीतील रुग्णसंख्या दोन हजार आहे. आतापर्यंत ४२६ रुग्ण सापडले असून यापैकी ५९ रुग्ण पोलीस कॉलनीमधील आहेत. तर दादरमध्ये २७१ कोरोनाबाधित असून कासारवाडी येथील पालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतीत १८ रहिवासी बाधित आहेत.

च्सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना वाढत आहे. कोरोना काळात धारावीतील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि सॅनिटाइजेशन करण्यासाठी मुंबई महापालिकेत सर्वप्रथम जी/उत्तर विभागामार्फत काम सुरू केले होते.च्केंद्रीय तपासणी पथकाने धारावी येथे पाहणी केल्यानंतर सफाईबाबत काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नियुक्त केलेल्या एका अशासकीय संस्थेकडून पुन्हा दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज करण्यात येत आहे.

च्१४०० सार्वजनिक शौचालयांच्या सॅनिटायझेशनची कामे नियमितपणे सकाळ आणि रात्रपाळी या पद्धतीने दररोज किमान चार ते पाचवेळा करण्यात येत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई