कोरोनाने केले महावितरणच्या ऊर्जेचे लोडशेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:04 AM2020-06-11T07:04:09+5:302020-06-11T07:04:21+5:30

कर्जाचा भार ग्राहकांच्या माथी : वीज बिलांचा भरणा होत नसल्याने परिस्थिती बिकट

Corona did load shedding of MSEDCL energy | कोरोनाने केले महावितरणच्या ऊर्जेचे लोडशेडिंग

कोरोनाने केले महावितरणच्या ऊर्जेचे लोडशेडिंग

Next

मुंबई : वीज ग्राहकांचे किमान तीन महिन्यांचे वीज बिल माफ करण्याची राजकीय पक्षांकडून केली जाणारी मागणी आणि कोरोना संक्रमणामुळे कोसळलेल्या आर्थिक अरिष्टामुळे राज्यातील वीज बिलांच्या वसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत २९१३ कोटींची बिले राज्यातील वीज ग्राहकांनी थकवली आहेत. वीज कंपन्यांचा डोलारा कोसळू नये यासाठी २१ हजार कोटींच्या कर्जास हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. मात्र, तो भारही आता ग्राहकांच्याच माथी येण्याची भीती वीज अभ्यासकांनी व्यक्त केली.

सुमारे ५० हजार कोटींची तूट भरून काढण्याची गरज व्यक्त करत महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची परवानगी मागितली होती. मात्र, मार्च महिन्यात आयोगाने दिलेल्या निर्णयात अपेक्षित दरवाढ मिळालेली नाही. त्यामुळे तूट भरून काढणे अवघड झाले आहे. त्यापाठोपाठ लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे क्रॉस सबसिडीचे गणितही बिघडले असून वीज खरेदी आणि विक्रीतून मिळणाऱ्या महसुलातील तूट वाढली आहे. मार्च महिन्यात ५०८७ कोटींच्या बिलापैकी ६१३ कोटींची थकबाकी होती. एप्रिल आणि मे महिन्यांत अनुक्रमे ३१०० आणि ३५०० कोटींची बिले पाठविली. मात्र, त्यापैकी ९०० आणि १४६० कोटींचा भरणाच झालेला नाही. त्यामुळे थकबाकी ४२ हजार कोटींवर झेपावल्याने महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच, कोरोनामुळे महावितरणच्या वीज वसुलीत किमान २० हजार कोटींची घट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीे.

ग्राहकांची कोंडी होण्याची भीती
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तूट आधीच वाढलेली आहे. त्यामुळे बिल भरणा होत नसल्याचे कारण पुढे करून ते कर्ज काढले जात आहे. ६ महिन्यांच्या अल्प मुदतीसाठी आणि किमान ४ टक्के व्याज दराने जरी हे कर्ज काढले तरी ते कर्ज आणि व्याजाची रक्कमही वीज ग्राहकांकडूनच महावितरण वसूल करेल, अशी भीती वीज अभ्यासक अशोक पेंडसे यांनी व्यक्त केली आहे. महावितरणच नाही तर वीज ग्राहकांची अभूतपूर्व कोंडी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रामाणिकपणे बिल भरणा व्हावा
महावितरणच्या कारभाराला आणि ग्राहकांच्या वर्तणुकीला शिस्त लागली नाही तर येणारा काळ कठीण असेल. दरवाढ आणि भविष्यातील विजेचे संकट टाळायचे असेल तर ग्राहकांनी प्रामाणिकपणे बिल भरायला हवे, असे मत या क्षेत्रातले अभ्यासक महेंद्र जिजकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Corona did load shedding of MSEDCL energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.