मुंबई - कोरोना व्हायसरपासून पसरत असलेल्या कोविड19 या आजाराबाबत लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. देशात जवळपास 2 महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आला, सध्याही अनलॉकमध्ये, लॉकडाऊन आहे. मात्र, कोरोनाचं संकट काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. याउलट कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे, आता कोरोनासोबतच आपण जगायला शिकलं पाहिजे. यासंदर्भातील एका चिमुकल्याच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलंय.
देशात आणि राज्यात अनलॉक व मिशन बिगेन अगेन ही प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने काही जिल्ह्यांनी पुन्हा एकदा 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे, नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आम्हाला जगू देणार की नाही, असंच सामान्य नागरिकांकडून बोललं जातंय. आता, आरोग्य मंत्रालयाने एक व्हिडिओ जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आता सोशल डिस्टन्स पाळूनच आपल्याला जगावं लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगताना दिसून येत आहे.
या व्हिडिओत एक चिमुकली मुलगी आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारते, सर, लॉकडाऊन तर संपल तरी कोरोना गेलाच नाही, आता काय?. चिमुकलीच्या या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देत, आता नियम पाळून आपणाला जगावं लागेल, कोरोनाविरुद्ध लढाई लढावी लागेल, असे सांगितले आहे. सोशल डिस्टन्स पाळा.....कोरोनाला घाला आळा... असा संदेशच आरोग्यमंत्र्यांनी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. सर्वांना मिळुन कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषता लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही टापे यांनी म्हटले आहे.