मुंबई : अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजाविताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यू देखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे राज्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल.
दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात आणि लॉकडाऊन काळातही कोविड योद्धा बनून महानिर्मित्तीच्या कर्मचाऱ्यांनी काम केलं आहे. वायरमनपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच नागरिकांना अखंडपणे वीजपुरवठ करण्याचं काम केलंय. त्यामुळे, डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणेच वीज वितरण विभागातील कर्मचारीही कोरोना वॉरियर्स आहेत.