कोरोना, लॉकडाऊनच्या काळात सर्प आढळण्याच्या घटनांत वाढ झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:25 PM2020-07-19T13:25:20+5:302020-07-19T13:26:04+5:30
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू झाला असतानाच या काळात सर्प आढळल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या.
मुंबई : मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू झाला असतानाच या काळात सर्प आढळल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या असून, अशावेळी मानसिक तणावात भर पडत असते. अशावेळी घाबरून जाऊ नये तर सर्पमित्राला फोन करून याची माहिती द्यावी, असे आवाहन करत सर्पमित्र आणि सर्प अभ्यासक भरत जोशी यांनी कोरोना काळात सर्वसाधारणपणे आठवड्यात किमान दोन ते तीन फोन सर्प आढळल्याचे येत असल्याचे सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत भोईवाडा, वरळी, कांदिवली, भांडूप, घाटकोपरसह अनेक परिसरातून याबाबतचे फोन आले आहेत, असेही जोशी यांनी सांगितले.
कोरोना, लॉकडाऊनच्या काळात वाढत असलेल्या सर्प नोंदीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भरत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भारतात सर्पांच्या एकूण २५५ प्रजाती आहेत. महाराष्ट्रात ५६ प्रजाती आहेत. शेकडा ९५ टक्के सर्प हे बिनविषारी असतात. केवळ ५ टक्के प्रजाती विषधर असतात. यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे आणि हिरवा घोणस यांचा समावेश होतो. तर धामण, धुळनागिण, कवड्या सर्प, डुरक्या सर्प, मंडोळ, मानेरी, पाणदिवड, श्वानमुखी सर्प हे बिनविषारी असतात. सर्प दंश झाल्यास ३० ते ३५ मिनिटांत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय गाठावे. यावेळेत मानसिक ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. सर्प दंशावरील उपचार सर्व शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध असतात. सर्प दंश झालेल्या व्यक्तीवर लगेच उपचार झाले तर ती व्यक्ती १०० टक्के वाचू शकते. हे करताना अंधश्रध्दा टाळणे गरजेचे आहे.
ऊनं पावसामुळे शेतजमिनीतील बिळामध्ये पाणी शिरल्याने, शहरी भागात बिळे, खड्डे यात पाणी भरल्याने सर्पांची सुरक्षा धोक्यात येते. सर्प आपल्या भक्ष्याच्या शोधात मनुष्य वस्तीत येतो. काही वेळा घरात, माज घरात, पडवीत, स्नानगृहात शिरतात. सर्प ताब्यात घेताना फोटो काढणे, शुट करणे टाळा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्प ताब्यात घेण्यास जाताना त्या ठिकाणी कोणी कोरोना बाधित व्यक्ती नाही ना याची काळजी घ्या. ताब्यात घेतलेल्या सर्पाला २४ तासांत मुक्त करा. नैसर्गिक अधिवासात मुक्त करा. सर्पाला मुक्त करताना तो जखमी नाही ना याची काळजी घ्या. कारण सर्प जखमी असल्यास त्यास मुंग्या लागतात. सर्प मुक्त करताना सोबत प्रथमोपचार पेटी ठेवा. सर्प पकडताना जेव्हा धोका नसतो तेवढा धोका हलगर्जीपणामुळे साप सोडताना असतो हे लक्षात ठेवा, असेही जोशी यांनी नमुद केले.