कोरोनात ई-नामद्वारे एप्रिलमध्ये शेतमालाची ३० कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:30 AM2020-04-27T04:30:40+5:302020-04-27T04:30:55+5:30
शेतमालाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार व्यवस्थेचीही शेतकऱ्यांना विशेष मदत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
योगेश बिडवई
मुंबई : कोरोनाच्या संकटात विविध निकषांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार व्यवस्थेचीही शेतकऱ्यांना विशेष मदत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्यात ई-नामच्या व्यासपीठाद्वारे महाराष्ट्रात तब्बल १७२ कोटींची उलाढाल झाली होती. लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात ई- नामद्वारे केवळ ३० कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी झाली आहे.
राज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी ६० बाजार समित्यांमध्ये ई -नाम प्रणाली कार्यरत आहे. ई-नामद्वारे मार्च महिन्यात ६ लाख क्विंटल मालाची खरेदी झाली. २३ मार्चनंतर राज्यात लॉकडाउन झाले. त्यानंतर शेतमालाचे व्यवहार थंडावले. त्याचा आॅनलाईन बाजारावरही परिणाम झाला. एप्रिल महिन्यात २५ तारखेपर्यंत राज्यात एक लाख क्विंटल शेतमालाची खरेदी झाली. त्याची उलाढाल केवळ ३० कोटी होती. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये केवळ २० टक्के व्यापार झाला, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाने लोकमतला दिली.
>शेतमालाचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी बाजार समितीसह इतर घटकांशी समन्वय ठेवला जात आहे. शेतमालाच्या खरेदीत ई-नाम व्यवस्थेत मर्यादा येतात. त्यामुळे शेतकरी कंपन्यांमार्फत शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. पणन मंडळातर्फे निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. - बाळासाहेब पाटील, पणनमंत्री