Join us

विमानांच्या गगनभरारीला कोरोनारूपी ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:06 AM

मुंबई विमानतळ; वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाणसुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विमानांच्या गगनभरारीलाही ...

मुंबई विमानतळ; वर्षभरात केवळ १ लाख १५ हजार विमानांचे उड्डाण

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमानांच्या गगनभरारीलाही कोरोनाने ग्रहण लावले आहे. मुंबई विमानतळावरून गेल्या वर्षभरात झालेल्या विमान प्रचलनाची आकडेवारी पाहिल्यास त्याचा अंदाज येईल. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान येथून १ लाख १५ हजार ८६४ विमानांनी उड्डाण केले. २०१९-२० च्या तुलनेत त्यात ६२ टक्के घट नोंदविण्यात आली.

देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे. आता ही संख्या एक लाखाच्या घरात स्थिरावली आहे. २०१९-२० मध्ये येथून ३ लाख ४ हजार ६७५ विमानांनी उड्डाण केले. तर २०२०-२१ मध्ये त्यात जवळपास ६२ टक्क्यांची घट झाली आहे. आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहिल्यास हवाई वाहतूक क्षेत्र धोक्यात येईल, अशी भीती वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मुंबईपाठोपाठ राज्यातील इतर महत्त्वाच्या विमानतळांवरील उड्डाणसंख्येतही प्रचंड घट नोंदविण्यात आली आहे. त्यात पुणे ६३.५० टक्के घट (१९ हजार ८३१ विमान प्रचलन), नागपूर ५९.८० टक्के घट (९ हजार २८२ विमान प्रचलन), औरंगाबाद ५८.६० टक्के घट (१ हजार ८७२ विमान प्रचलन) या विमानतळांचा समावेश आहे.

दिल्लीसह देशातील अन्य वर्दळीच्या विमानतळांवरील विमान प्रचलनही कोरोनाकाळात कमी झाले आहे. दिल्ली विमानतळावरील उड्डाणसंख्येत ५२.४० टक्के, बंगळुरू ५०.७० टक्के, हैदराबाद ५३.१०, कोची ६२.३०, कोलकाता ५६.५०, अहमदाबाद ५२.५०, गोवा ६१.६० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

देशभरातील वायू प्रचालनाचा विचार करता वर्षभरात त्यात ५३.७० टक्के घट झाली आहे. २०१९-२० मध्ये देशभरातून २५ लाख ८७ हजार ५४ विमानांनी उड्डाण केले होते. २०२०-२१ मध्ये ही संख्या ११ लाख ९६ हजार ७४० वर स्थिरावली आहे.

* मुंबई विमानतळावरील उड्डाणे

प्रकार - २०२०-२१......२०१९-२०...... घट

देशांतर्गत -९२,१२८.......२,२८,६८१...... ५९.७ टक्के

आंतरराष्ट्रीय -२३,६६६....... ७५,९९४........ ६८.९ टक्के

एकूण - १,१५,८६४......३,०४,६६७..... ६३ टक्के

---------------------------------------