जागतिक पर्यावरण दिन विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण आता प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. कोरोनाशी लढताना आपण अनेक प्लास्टिकच्या घटकांचा वापर करत आहोत. यात मास्कपासून पीपीई किटचा समावेश आहे. हे घटकही पर्यावरणाला घातक आहेत. केवळ आताच नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून आपण प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वापरत असून, यामुळे समुद्राची, जलचरांची मोठी हानी झाली आहे, अशी खंत तज्ज्ञांनी व्यक्त केली.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्यावतीने ‘परिसंस्थेचे पुनरुज्जीवन : कोरोना आणि समुद्र’ या विषयावर वेबिनारचे आयाेजन करण्यात आले हाेते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सल्लागार डॉ. एम. सुधाकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. मालती गोयल आणि अॅकेडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्चचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. रामय्या नागप्पा या वेबिनारमध्ये सहभागी झाले हाेते.
डॉ. मालती गोयल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी काय करता येईल? याचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, समुद्राच्या पाण्याची उष्णता, चक्रीवादळांचे प्रमाण वाढत आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणही वाढत असून, समुद्र दिवसागणिक प्रदूषित होत आहे. समुद्रातील ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. त्यामुळे जैवविविधतेची मोठी हानी होत आहे. प्लास्टिक हा घटक समुद्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करत आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आपण एकाचवेळी अनेक संकटांशी लढत आहोत. त्यामुळे केवळ प्लास्टिकच नव्हे तर आपण प्रत्येक स्तरावरील प्रदूषण कमी करण्यासाठी काम केले पाहिजे.
डॉ. एन. रामय्या नागप्पा यांनी यावेळी सागरी जैवविविधतेवर सादरीकरण केले. या सादरीकरणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन कसे गरजेचे आहे, परिसंस्था टिकविण्यासाठी कसे काम केले पाहिजे? याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय हवामान शास्त्र विभागाचे माजी अतिरिक्त महासंचालक हरी नारायण श्रीवास्तव यांनी केले.
...............................................................................