Join us

आरोग्य विमा कंपन्यांसाठी कोरोना ठरतोय ‘इष्टापत्ती’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 7:26 PM

सर्वसामान्यांची विमा काढण्यासाठी लगबग; कोरोनासोबत जगण्यासाठी विमा अत्यावश्यक असल्याची भावना

 

संदीप शिंदे

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन करणारे सरकार आता आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे सांगू लागले आहे. त्यामुळे कोरोना पुढील काही महिने तरी आपला पिच्छा सोडणार नाही याची खात्री प्रत्येकालाच पटली आहे. त्यातच कोरोनाच्या उपचारासाठी होणा-या खर्चाच्या आकड्यांमुळे अनेकांना धडकी भरली आहे. आपल्यालाही कोरोनाची लागण झाली तर उपचारांचा खर्च कुठून करायचा या भीतीपोटी अनेकांनी आरोग्य विमा काढण्याची लगबग सुरू केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या व्यवसायात मोठी वृध्दी होणार आहे.

कोरोनापूर्वी साधारणपणे तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कव्हर असलेली पॉलिसी काढण्याकडे सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाचा कल असायचा. मात्र, कोरोनाग्रस्तांवरील रुग्णांवरील उपचारांचे आकडे बघितल्यानंतर ती रक्कमही तोकडी पडेल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. ठाण्यातील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्याकडे अडीच ते चार लाखांचे कव्हर असलेली पॉलिसी होती. त्यानंतरही उपचारांवर तब्बल ९ लाख रुपये अतिरिक्त खर्च झाले आहेत. कोरोनाची दहशत प्रचंड वाढली असून आरोग्य विम्याची नवी पॉलिसी काढणे, आहे त्या पॉलिसीचे कव्हर वाढवून घेणे किंवा अतिरिक्त पॉलिसी काढण्याच्या प्रमाणात वाढल्याची माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे. पती पत्नी आणि दोन मुलांसाठी जर तीन लाख रुपयांपर्यंतची पॉलिसी काढायची असेल तर २० ते ३० लाखांपर्यंतचा प्रिमियम ( कंपनी आणि विमा धारकांच्या वयोमानानुसार) आकारला जातो. सध्या सध्या अडीच ते तीन लाखांपर्यंतची पॉलिसी घेण्याचे प्रमाण जास्त दिसत आहे. मात्र, आर्थिक कोंडीत अडकलेल्या अनेकांना इच्छा असतानाही प्रिमियमचे पैसे अदा करणे शक्य होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

----------------------------------

कामगारांच्या विम्यालाही चालना  

छोट्यामोठ्या उद्योगांना परवानगी देतानाही कामगारांच्या विम्याची सक्ती सरकारने केल्यामुळे कामगारांच्या आरोग्य विम्याला चालना मिळू लागली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये विमा काढलेला असतो. मात्र, सूक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाते. साधारणपणे १० कामागारांचा एक लाख रुपयांपर्यतचे कव्हर असलेला ग्रुप इन्श्युरन्स काढायचा असेल तर विविध वयोगटानुसार १८ ते ४२ लाख रुपयांपर्यंत प्रिमियम भरावा लागतो. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे पहिल्या दिवसापासून विम्याचे कव्हर अत्यावश्यक असल्याने ती रक्कम २४ हजार ते ५४ हजारांपर्यंत जाते. राज्य कर्मचारी विमा योजनेत सदस्य असले तरी कामगारांचा स्वतंत्र विमा काढायचा का, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.  

----------------------------------

आँनलाईन विम्याकडे कल

आँनलाईन विमा काढणा-यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जात असून सध्याच्या निर्बंधांमुळे तसा विमा काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख कंपन्यांनी कोरोनासाठी विशेष पॉलिसीसुध्दा जाहीर केली आहे. तर, काही कंपन्यांनी फक्त कोवीड – १९ साठी विमा पॉलिसी आणली आहे.  

-------------------------------------

आक्रमक मार्केटींग

काही कॉर्पोरेट एजंट आक्रमक पध्दतीने मार्केटींग करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी ई - मेल आणि एसएमएसचा सर्रास वापर केला जात आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँण्ड डेव्हलपमेंट अथाँरिटीने (आयआयआरडीए) प्रत्येक कुटुंबाला पाँलिसी काढण्याचे कोणतेही आवाहन केले नसताना तसे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहेत.

 

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस