Coronavirus; कोरोनाच्या भीतीमुळे बहुसंख्य पॅथॉलॉजी लॅबला लागले टाळे; दहशतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 02:19 AM2020-03-29T02:19:45+5:302020-03-29T06:24:13+5:30
चाचण्यांसाठी रुग्णांची ससेहोलपट होण्याची भीती
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर अनेक डॉक्टरांनी आपल्या ओपीडी बंद केल्या असतानाच रक्ताच्या नमुन्यांसह विवध तपासण्या करणा-या मुंबई ठाण्यातील बहुसंख्य पॅथलॉजी लॅबलाही टाळे लागले आहे. चाचणीसाठी आलेले नमुने जर कोरनाबाधित रुग्णाचे असतील तर निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती आणि कर्मचा-यांची गैरहजेरी अशी कारणे लॅबच्या लॉकडाऊनसाठी दिली जात आहे. मात्र, या टाळेबंदीमुळे विवध तपासण्यांची गरज असलेल्या रुग्णांची ससेहोलपट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक ठिकाणी डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करत रुग्णसेवा करत असले तरी बहुसंख्य ठिकाणी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचा-यांमध्ये कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या ओपीडी बंद असून त्या सुरू केल्या नाही तर कारवाई करावी लागेल असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. परंतु, ओपीडी सुरू ठेवणे घातक असून सरकार सक्ती करू शकत नाही असे मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांचे म्हणणे असून तसा पत्रव्यवहार आरोग्यमंत्र्यांकडे केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याच धर्तीवर पॅथलॉजी लॅब सुरू ठेवणेसुध्दा तितकेच धोकादायक असल्याचे या पदाधिका-यांचे म्हणणे आहे.
कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एखाद्या रुग्णाचे रक्त किंवा अन्य चाचण्या आमच्या लॅबमध्ये आल्या तर ते कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण कर्मचा-यांना नाही. त्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने नसल्याने कर्मचारी धोका पत्करण्यास तयार नाहीत. तसेच, अशा रुग्णाचे नमुने जर तपासले गेले तर संपुर्ण लॅबच नव्हे तर सभोवतालच्या परिसराचेही शास्त्रोक्त पध्दतीने निर्जंतूकीकरण करावे लागेल. त्यामुळे हा धोका पत्करण्यास अनेक जण तयार नसल्याने लॅब बंद असल्याची माहिती हाती आली आहे.
ज्या पॅथलॉजी लॅबचे विवध हॉस्पिटलशी संलग्न (आयपीडी) आहेत त्यापैकी काही ठिकाणी चाचण्या सुरू आहेत. मात्र, हॉस्पिटलव्यतिरीक्त खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि वै यक्तीत पातळीवर नियमीत चाचणीसाठी येणा-या (ओपाडी) रुग्णांना तिथे नकारघंटा वाजवली जात आहे.
‘काही दिवसांत परिणाम दिसतील’
गेल्या दोन तीन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया, फ्लू किंवा कावीळ यांसारखे साथीचे रोग नव्हते. त्यामुळे आजारी पडण्याचे आणि पॅथलॉजी चाचण्यांसाठी येणा-यांचे प्रमाण कमीच होते. त्याशिवाय कोरोनाच्या दहशतीमुळे त्यात आणखी घट झाली आहे. परंतु, पुढल्या आठवड्याभरात कोरोनाव्यतिरीक्त आजारांचे निदान करण्यासाठी किंवा नियमीत तपासण्यांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढेल आणि त्याचे परिणाम दिसू लागतील अशी शक्यताही पॅथलॉजी लॅब असोसिएशनच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे. तसेच, कोरोना पावसाळ््यातील रोगराईच्या काळात दाखल झाला असता तर मोठा अनर्थ ओढावला असता असे मतही त्यांनी व्यक्त केले.