मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे गणपती आगमन व विसर्जन सोहळ्याच्यावेळी दिसणाऱ्या भव्य मिरवणूका व त्याला ढोल पथक,लेझीमची मिळणारी साथ यंदा दिसणार नाही.कोरोनाचा ढोल पथकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
कोरोना मुळे मुंबई पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळे या वर्षी साधे पणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत याचा फटका अनेक घटकांना बसणार आहे, तसाच तो डबेवालांच्या “ढोल पथकांना” बसला आहे. मुंबईत डबेवाल्यांची अनेक ढोल पथके कार्यरत आहेत.गणपती उत्सवात मुंबई पुण्यात ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.एकीकडे लॉकडाऊन पासून कोरोना मुळे डबेवाल्यांचा रोजगार बुडाला असतांना आता आता गणपतीत देखिल ढोल पथकांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
ढोल पथकांना गणपती मध्ये मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते.या मागणी मुळे दोन तास वाजवण्याची १५ ते २० हजार रूपये बिदागी ढोल मंडळींस मिळत असे. अशा प्रकारे प्रत्येक ढोल पथक लाखो रूपये कमाई होत असे या कमाईला आता मुकावे लागणार आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी लोकमतला दिली.
ऐरवी मुंबई,पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव असला की डबेवाल्यांच्या ढोल पथकांना चांगली बिगादी मिळत असे पण ती बिदागी आता मिळणार नाही. पुणे जिल्ह्यातील मावळ पट्यात ढोल पथके मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या विशिष्ठ वाजवण्याच्या पध्दती मुळे त्यांना पुणेरी ढोल म्हणतात. या पुणेरी ढोलांना गणपतीत मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते.मात्र यंदा कोरोनामुळे या कमाईला आता मुकावे लागणार आहे अशी माहिती पुणे, तालुका राजगुरू नगर, मु.पो. गडद येथील भैरवनाथ ढोल मंडळाचे अध्यक्ष दत्ता निकम यांनी शेवटी दिली.