मुंबई : कोरोनाबाधित ५०० गर्भवतींची सुखरूप प्रसूती करण्यात नायर रुग्णालयाला यश आले आहे. माता बाधित असूनही येथील डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे ५०३ नवजात बालकांना कोरोनाची लागण झालेली नाही. माता व बालकांची प्रकृती उत्तम असल्यामुळे यापैकी ४६७ जणींना घरी पाठविण्यात आले. याची दखल ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकोलॉजी अॅण्ड ऑब्स्टेट्रीक्स’ या संस्थेने घेतली आहे. त्यांच्या अधिकृत जर्नलमध्ये नायर रुग्णालयाच्या कार्याची नोंद केली आहे. नायर रुग्णालयातील नवजात शिशू बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. नीरज महाजन यांनी ही माहिती दिली.
गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळालाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवतींची विशेष काळजी घेण्यात येते. त्यामुळे अशा पाचशे प्रसूती सुखरूप करण्यात आल्या. यातील ११ बाळांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ही सर्व बालके काही दिवसांत कोरोनामुक्त झाली आहेत.