कोरोनामुक्त रुग्णांची पुन्हा ओपीडीकडे धाव, दीड हजार जणांना विविध आजारांनी ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:27 AM2020-12-25T07:27:42+5:302020-12-25T07:29:16+5:30
CoronaVirus News : उच्च क्षमतेच्या उपचारपद्धतीमुळे पित्ताचा त्रास, झोप न लागणे, दम लागणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे, असे त्रास बहुतांश रुग्णांना दोन ते तीन महिने जाणवतात.
मुंबई : फुप्फुस आणि रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करणाऱ्या कोरोना विषाणूमुळे आजारातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांच्या आरोग्याबाबत तक्रारी कायम आहेत.
उच्च क्षमतेच्या उपचारपद्धतीमुळे पित्ताचा त्रास, झोप न लागणे, दम लागणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे, असे त्रास बहुतांश रुग्णांना दोन ते तीन महिने जाणवतात. तर, काहींना मूत्रपिंडाचे विकार, मधुमेहाचा त्रास आणि मानसिक विकाराचा सामना करावा लागतो.
त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडी महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना मुंबईतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांत स्थापन वॉर रूमद्वारे संपर्क साधला जातो.
या केंद्रांत वरिष्ठ व ज्युनिअर डॉक्टर रुग्णांची विचारपूस व तपासणी करतात. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक रुग्णांनी या ओपीडीमध्ये हजेरी लावली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळेच प्रशासन नेहमीच काळजी घेण्याचे आवाहन करते.
काय काळजी घेतली जाते
पालिकेच्या रुग्णालयातून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना विभाग कार्यालयातील वॉर रुमद्वारे संपर्क साधला जातो. यापैकी कोरोनामुक्त झाल्यानंतरही आरोग्याची तक्रार असलेल्या नागरिकांना नजीकच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये बोलाविण्यात येते. काही रुग्णांना लाँग कोविडचा त्रास संभवतो. त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
मार्गदर्शन केले जाते.
सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही आरोग्याची तक्रार असलेले नागरिक उपचारांसाठी येत आहेत. त्यांची तपासणी करून योग्य उपचार अथवा मार्गदर्शन केले जात आहे.
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त महापालिका आयुक्त