राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा, एकूण १८ बक्षीसं देणार; पहिलं बक्षीस ५० लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:36 PM2021-06-02T15:36:02+5:302021-06-02T15:36:24+5:30
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील नागरिकांना प्रेरणा मिळण्यासाठी 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा केली आहे.
Maharashtra Corona Updates: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० मे रोजी राज्यातील जनतेशी संवाद साधताना प्रत्येकानं आपलं गाव करोनामुक्त कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं. माझं गाव कोरोनामुक्त मोहिमेची सुरुवात राज्य सरकार करणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यात आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील नागरिकांना प्रेरणा मिळण्यासाठी 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा केली आहे. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावाला तब्बल ५० लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तसेच गावातील विकास कामासाठी प्राधान्य दिलं जाईल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अजूनही कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती वाढावी यासाठी राज्य सरकारनं नामी शक्कल लढवली आहे.
'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची माहिती देताना हसन मुश्रीफ यांनी राज्यात एकूण ६ महसूल विभागांमध्ये प्रत्येकी ३ अशी एकूण १८ पारितोषिकं दिली जाणार आहेत. त्यात पहिल्या क्रमांसाठी ५० लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पारितोषिक जिंकणाऱ्या गावांना पारितोषिकाची रक्कम गावातील विकास कामांसाठी वापरता येणार आहे.
'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेसाठी एकूण २२ निकष असणार आहेत. यात एकूण ५० गुणांची रचना केली जाईल. सर्वाधिक गुण पटकावणारं गाव विजयी घोषीत करण्या येणार आहे. यात गावात कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन, कोरोनाला हद्दपार करणं आणि आरोग्य संबंधीची जनजागृती अशा विविध निकषांचा समावेश असणार आहे.