नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध उपाययोजना केल्या जात आहे. अनेक दिवसांच्या निर्बंधांनंतर आता काही प्रमाणात शिथिलता आणली जात आहे. महाराष्ट्र सरकारनेही मुंबई एअरपोर्टवर उतरणाऱ्या सर्व डोमेस्टिक प्रवाशांसाठी नियमांमध्ये काही शिथीलता आणली आहे. आतापर्यंत बाहेर येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी प्रवासाच्या ४८ तासांआधीचा आरटी पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक केले होते. हा नियम आताही आहे परंतु यात काहीसा बदल केला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी या नियमातून सूट देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसार, राज्यात कोणत्याही माध्यमातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक आहे. मुंबई शहरात येणाऱ्या सर्वांसाठी हा रिपोर्ट गरजेचा आहे. सुरुवातीला केवळ गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांना हा रिपोर्ट देणे बंधनकारक होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सर्व प्रवाशांना हा नियम लागू करण्यात आला.
सध्या संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. अशावेळी अनेक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेतले असून त्यांना आरटीपीसीआर रिपोर्टमधून सूट देण्यात यावी अशी मागणी झाली होती. अनेक प्रवाशी असे आहेत जे बिझनेसच्या कामानिमित्त मुंबई-दिल्ली, गुजरात किंवा अन्य राज्यात प्रवास करत असतात.
अशावेळी कमीत कमी वेळेत आरटी पीसीआर टेस्ट करणं आणि रिपोर्ट आणणं त्यांच्यासाठी कठीण जातं. त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर रिपोर्टमधून सूट दिली जाऊ शकते.