कोरोना देतोय प्रत्येक घराला एकत्रित कुटुंबाचा अनुभव...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:55 AM2020-05-15T04:55:44+5:302020-05-15T04:56:16+5:30
कोरोनाचे जगावर आलेले संकट अनपेक्षित आहे. मात्र या संकटाने दूर गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणून (जबरदस्तीने का होईना) नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व देताना दिसत असले तरी व्हर्च्युअल संवादाने कुटुंबातील सीमारेषा पुसल्या जात आहेत.
- सीमा महांगडे
मुंबई : कोरोना काळात घरातले सगळे सदस्य घरातच लॉकडाउन झाल्याने बच्चे कंपनीसह घरातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यांवर समाधानाची लकेर उमटली आहे. कोणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने एकीकडे घरातच लेकरांसोबत पत्ते, बुद्धिबळ, ल्युडो, कॅरम आदी खेळ खेळण्यात दिवस निघून जात आहेत. तर दुसरीकडे वडापाव, पावभाजी, पाणीपुरी, केक, मिसळ, ढोकळा आदी खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू आहे. ‘व्हॉट्सअॅप’, ‘फेसबुक’, ‘हाइक’ इत्यादी माध्यमांवर असलेले फॅमिली ग्रुप सध्या खूपच अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहेत. बिर्याणी, तंदुरसुद्धा घरात बनवून मैत्रिणींना, नातेवाइकांना व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून दाखवत त्यांच्यात जणू पाककृतीची स्पर्धाच सुरू झालेली दिसत आहे.
कोरोनाचे जगावर आलेले संकट अनपेक्षित आहे. मात्र या संकटाने दूर गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणून (जबरदस्तीने का होईना) नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व देताना दिसत असले तरी व्हर्च्युअल संवादाने कुटुंबातील सीमारेषा पुसल्या जात आहेत. कोरोनाने आधीच्या कौटुंबिक संवादाला पुन्हा मार्ग मोकळा केल्याचे डॉ. सुमित शिंदे सांगतात. वर्क फ्रॉम होम करतानाही मिळालेल्या वेळात बरेच जण स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी हा वेळ सत्कारणी लावत आहेत. धावत्या मुंबईत नवरा-बायकोने एकत्र वेळ व्यतीत करणे म्हणजे आॅफिस टास्कपेक्षा मोठा टास्क, पण या लॉकडाउनमुळे सर्वच जोडप्यांना नात्यासाठी एक हक्काचा वेळ
मिळाला असल्याचे मत ते व्यक्त करतात.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे या लॉकडाउनमुळे कुटुंबांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला असला तरी कुटुंबामध्ये वाढलेल्या तणावांचे प्रमाणही वाढल्याची प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.
लॉकडाउनच्या काळात जी कुटुंबे एकत्र आहेत, त्यांच्यातील तणाव, भांडणांचे प्रमाण निश्चित वाढले आहे. २४ तास घरात राहिल्याने चिडचिड वाढून सारखे खटके उडत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी म्हटले. लॉकडाउनने जर व्हर्च्युअली जगाला जवळ आणले असेल तर घरांतील, कुटुंबातील माणसांना तितक्याच दूर लोटले असल्याची प्रतिक्रिया डॉ. मुंदडा यांनी दिली.
कोरोनाच्या या काळात फॅमिली दॅट प्रेज टुगेदर, इट्स टुगेदर, स्टेज टुगेदर... म्हणून चालणार नाही, तर फॅमिली दॅट फाइट्स टुगेदर असेही म्हणावे लागणार आहे...!