भावनिक प्रथमोपचार; राज्यभरात हेल्पलाइन कार्यरत
सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढू लागल्यामुळे भविष्याबद्दलच्या अनामिक भीतीने अनेक जण चिंतित आहेत. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या काळजीने अस्वस्थतेत भर पडत आहे. मनावरचा ताण वाढल्याने मानसिक आरोग्य बिघडत आहे. ही बाब लक्षात घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यभरात अनोखी हेल्पलाइन सुरू केली आहे. ‘मानस मैत्र’ असे तिचे नाव असून, नागरिकांना मानसिक आधार देण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा अशा पाच विभागांत मानस मैत्रचे काम चालते. त्यासाठी राज्यभरात ९० कार्यकर्ते कार्यरत आहेत. कोरोना काळात ३५० हून अधिक नागरिकांना मानसिक तणावातून मुक्त करण्यात त्यांना यश आले आहे. रायगड, रत्नागिरी आणि ठाण्यात तर जिल्हा प्रशासनाने या हेल्पलाइनला आपल्या कोविड कार्याशी जोडून घेतले आहे. हे कार्य पूर्णतः स्वयंप्रेरणेने चालते. कोणालाही कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही.
* प्रशिक्षित मानस मित्रांची फौज
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागातर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रदीप पाटकर यांनी हेल्पलाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व मानस मित्रांना प्रशिक्षण दिले आहे. शिक्षक, नोकरदार महिला, गृहिणी, सरकारी अधिकारी, महाविद्यालयीन तरुणांचा यात समावेश आहे. तणावाखाली असलेल्या व्यक्ती साधारण कोणते प्रश्न विचारू शकतात, त्यांच्या समस्या काय असतात, त्यांना कशा प्रकारे बोलते करावे, समुपदेशन कसे करावे याची तयारी त्यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे हेल्पलाइनशी संपर्क करणाऱ्यांची सगळी माहिती गुप्त ठेवली जाते.
* महिला सर्वाधिक तणावाखाली
कोरोना काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याने तणावग्रस्त महिलांचे फोन सर्वाधिक येऊ लागले आहेत. माहेरी जायला मिळत नाही, सासरी घुसमट होते किंवा मानसिक सुख मिळत नाही, अशा तक्रारी त्या करतात. स्पर्धा परीक्षा रद्द झाल्याने दडपणाखाली गेलेल्या अनेक तरुणांचेही या काळात फोन आले. नोकरी गेल्याने भविष्याबाबत चिंतेत असलेले तरुण तर आत्महत्येचा विचार येत असल्याचेही सांगतात. कोविड सेंटरमधील स्थिती पाहून डिप्रेशनमध्ये गेलेले रुग्ण असंबद्ध बडबड करू लागले की, डॉक्टर स्वतःहून मानस मैत्रशी त्यांना जोडून देतात. प्रत्येकाच्या कलाने घेऊन त्यांचे भावनिक प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस तथा मानस मैत्र हेल्पलाइनचे समन्वयक विनायक सावळे यांनी दिली.
..............................