Join us

कोरोना वाढला; सॅनिटायझरचा वापर मात्र घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:05 AM

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून सरकारच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम सर्वांना बंधनकारक करण्यात आले ...

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून सरकारच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र, अनेक जण कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने हे नियम पाळत नाहीत.

२०२० च्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच मेडिकलमध्ये सॅनिटायझर व मास्क यांची मागणी वाढली. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिक मेडिकलमधून मास्क व सॅनिटायझर खरेदी करून त्याचा वापर करू लागले. यामुळे सुरुवातीच्या काळात सॅनिटायझर व मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. हळूहळू कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी झाली. यामुळे मेडिकलमधून सॅनिटायझरच्या मागणीतदेखील घट झाली.

सुरुवातीच्या काळात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवा, तसेच सतत सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व जाहिरातींच्या माध्यमातून करण्यात येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केल्याने नागरिकांना कोरोनाची भीती राहिली आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

सुरुवातीला सॅनिटायझरच्या किमती जास्त असल्याने प्रत्येकाला सॅनिटायझरची बाटली विकत घेणे परवडत नव्हते. यासाठी सरकारने जेवढे लिटर सॅनिटायझर असेल त्याच्या अर्ध्या किमतीत ते विकण्याचा नियम काढला. यामुळे सॅनिटायझरच्या किमती स्वस्त झाल्या. प्रत्येक घरात सॅनिटायझरची बॉटल विकत घेतली गेली. मात्र, आता सॅनिटायझर विक्रीमध्ये ९० टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याचे मेडिकल दुकानदारांचे म्हणणे आहे.

कैलास तांदळे (अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन) - काही महिन्यांपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे नागरिकांनी सॅनिटायझर वापरणे जवळपास बंद केले आहे. यामुळे मेडिकलमधून सॅनिटायझरची विक्रीदेखील घटली आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही सुरू असल्याने आपल्या हातांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्यासाठी सॅनिटायझर सतत आपल्या सोबत असणे आपल्या फायद्याचे आहे. नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेऊन सॅनिटायझरचा वापर करायला हवा.

नितेश गायकवाड (रहिवासी, मानखुर्द) -

कोरोनाचा प्रकोप अद्यापही थांबला नसल्याने सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. मी घरात असल्यावर प्रत्येक अर्ध्या तासाने हात धुतो. त्याचप्रमाणे माझ्या बॅगेत, तसेच ऑफिसमध्ये कायम सॅनिटायझरची बाटली माझ्याजवळ असते. त्यामुळे माझ्या हातांची स्वच्छता नेहमी राखली जाते.

भालचंद्र साळवे (रहिवासी, चेंबूर) - मागील काही महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सॅनिटायझरचा वापर अत्यंत कमी झाला होता. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे गरजेचे आहे. मी माझ्या कुटुंबीयांना हे नियम सातत्याने पाळण्याचे आवाहन करतो. त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्वांकडे नेहमी सॅनिटायझरची बाटली असते.