मुंबई : कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून सरकारच्या वतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या लॉकडाऊनमध्ये शाळा कॉलेज तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या. त्यामुळे नागरिक घरीच थांबू लागले. सामान्य घरांमधील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नोकरीधंद्यानिमित्त घराबाहेर पडतो. आपली नोकरी-व्यवसाय वाचविण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातदेखील अनेक तरुणांना घराबाहेर पडावे लागले. मात्र या तरुणांमुळे घरातील लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. त्यामुळे घरात राहूनदेखील कोरोना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक तरुण हे आपल्या बिनधास्त स्वभावामुळे विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरतात. आपल्या परिसरात नाक्यावर मित्रांसोबत गप्पा मारताना सुरक्षित अंतर न पाळून उभे राहतात. यामुळे नकळत ते कोरोनाबाधित होऊन त्याचा संसर्ग संपूर्ण कुटुंबात करतात. अनेक तरुणांमध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली असून त्यांची रोगप्रतिकारक शक्तीदेखील चांगली असते. मात्र घरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांची प्रकृती खालावते.
सोळा वर्षांखालील पॉझिटिव्ह- ९ टक्के
साठ वर्षे वयापेक्षा अधिकचे पॉझिटिव्ह- १७ टक्के
एकूण पॉझिटिव्ह- ५,२०,४९८
बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी -
* बाहेरून घरात येण्यापूर्वी दारातच स्वतःचे आणि स्वतः सोबत असणाऱ्या सर्व वस्तूंचे सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करावे.
* शक्य असल्यास घराच्या बाहेरच हातपाय स्वच्छ धुवावे
* घरातील सदस्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करावी व काढ्याचे सतत सेवन करावे
ही पाहा उदाहरणे
१) काही महिन्यांपूर्वी रेस्टॉरंट ५० टक्के आसन क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर मुंबईतील वांद्रे येथे एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा मानखुर्द येथील तरुण कोरोनाबाधित झाला. त्याला सौम्य लक्षणे जाणवली होती. मात्र त्याच्या घरातील त्याचे ७५ वर्षीय आजोबा कोरोनाबाधित झाले व त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
२) मुंबईत अनेक पोलीस कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे काही पोलिसांचा मृत्यूदेखील झाला होता.
डॉ शैलेश देवळे - ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावते. काही जणांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने तसेच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. घरात ज्येष्ठ नागरिक व लहान मुले असल्यास तरुणांनी अधिक काळजी घ्यायला हवी.