मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मे महिन्याच्या अखेरीस ४० हजारपर्यंत पोहचेल, असा अंदाज केंद्राने वर्तवला होता. मात्र सद्यस्थितीत मुंबईत २२ हजार रुग्ण आहेत. यात दररोज सरासरी दीड हजारांची वाढ होत असली तरी मे अखेरीस हा आकडा २७ हजारपेक्षा जास्त नसेल. तसेच मृत्यू दर ३.२ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका यंत्रणा कमी पडणार नाही, अशी ग्वाही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलीे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह आयुक्तांनी मंगळवारी आॅनलाइन पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील कोरोनाच्या स्थितीची त्यांनी माहिती दिली. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३२ हजारांवर गेली असली तरी यातील आठ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर होम क्वारंटाइन केलेल्या १२ हजारपैकी नऊ हजार बरे झाले आहेत. एप्रिलमध्ये असणारा ७.६ मृत्यू दर आता ३.२ पर्यंत खाली आला आहे. राष्ट्रीय मृत्यू दर ३.० आहे. म्हणजेच मृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. तो आणखी खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
रुग्ण दुपटीचे प्रमाण १४ दिवसांवर
च्मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर दर तीन दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. एप्रिल महिन्यात दर सात दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले होते.च्पालिकेने हे प्रमाण २० दिवसांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी आठ सनदी अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. सध्या मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १४ दिवसांवर आले आहे.