कोरोना : दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:34 PM2020-07-12T14:34:56+5:302020-07-12T14:35:49+5:30
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार उद्योग धंदे बंद पडले आहेत. ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांगावर.
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार उद्योग धंदे बंद पडले आहेत. ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांगावर. त्यांच्या उत्पन्नावर मोठे संकट आले असून त्यांना सरकारकडून कोणतेही पॅकेज मिळालेले नाही. म्हणूनच सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट आणि नॅशनल एबिलिम्पिक्स असोसिएशन ऑफ इंडियाने दृष्टिकोण नावाखाली पुढाकार घेतला आहे.
नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट या सर्वेक्षणानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये केवळ ०.०५ टक्के दिव्यांग कर्मचारी आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी ३ टक्के सरकारी संस्थांमध्ये असणे आवश्यक आहे. तर यामध्ये दिव्यांग कर्मचारी केवळ ०.५४ टक्के आहेत. कोरोनामुळे ही टक्केवारी सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे. परिणामी सार्थकने व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ग्रामीण भागातील दिव्यांगांनी ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी लॅपटॉप वितरण मोहीम सुरू केली. दिव्यांगांसाठी जुन्या किंवा नवीन लॅपटॉपची देणगी देण्याचे आवाहन केले जात आहे. याचा फायदा ग्रामीण सशक्तीकरण प्रकल्पांना होईल. दिव्यांगसाठी एक मोबाइल अँपदेखील तयार करण्यात आले आहे. ज्याच्या सहाय्याने त्यांना विविध योजना, रोजगार आणि अन्य सहाय्य संबंधित माहिती मिळू शकेल. याव्यतिरिक्त ग्लोबल ई-लर्निंग प्लॅटफॉर्म तयार केले जात आहे.
............................
सार्थक यांनी सुरू केलेल्या सामाजिक चळवळीला पाठिंबा देण्यास आम्ही उत्सुक आहोत. नीति आयोग सार्थकच्या वतीने कॉर्पोरेट आणि इतर संस्थांपर्यंत पोहोचून लॅपटॉप मिळविण्याच्या मोहिमेस पाठिंबा देईल. ज्यामुळे दिव्यांगांना इ-लर्निंगद्वारे नवीन कौशल्ये शिकता येतील. २०२१ च्या जनगणनेत दिव्यांगांच्या विशेष गरजा देखील आम्ही विचारात घेऊ.
- डॉ.राजीव कुमार, उपाध्यक्ष, नीति आयोग