कोरोना : भावनिक आधारासाठी हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:43 PM2020-04-08T17:43:58+5:302020-04-08T17:44:53+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम

Corona: Helpline for Emotional Support | कोरोना : भावनिक आधारासाठी हेल्पलाईन

कोरोना : भावनिक आधारासाठी हेल्पलाईन

Next

 

मुंबई : कोरोनाचे थैमान सुरु आहे. या शतकातील सर्वात मोठी आरोग्य विषयक आणिबाणी या आजाराने जगभर निर्माण केली आहे. याचा मानवी जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांवर मूलगामी आणि दूरगामी परिणाम होत आहेत, होणार आहेत. मानसिक आरोग्यावर देखील याचे विपरीत परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या एखाद्या मोठ्या संकटामुळे अनामिक भीती, चिंता, ताण वाढतो आणि भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानस मैत्र ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

समितीचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर  यांनी याबाबत सांगितले की, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊन परिस्थितीत घरातच कोंडले गेल्यासारखी स्थिती असल्याने चिंता, अस्वस्थता वाटणे, स्वत:ची कुटूंबीयांची काळजी वाटणे, ताण येणे, घरात एकट्याच असलेल्या व्यक्तींना अस्वस्थ वाटणे, भविष्याच्या अनिश्चिततेमुळे आणि पुढील काळातील रोजगार, उद्योग व्यवसाय, आर्थिक मंदी या सारख्या प्रश्नांमुळे अनामिक भीती, दडपण येणे या सारख्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा स्वरुपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते. पण यावेळी अशा व्यक्तींना आवश्यक भावनिक आधार व धीर मिळाला तर निश्चितच ते या स्थितीतून बाहेर यायला मदत होऊ शकते. खरे तर प्राथमिक स्तरावर त्यांचे मनमोकळे ऐकून घेणे, त्यांना भावनिक, मानसिक आधार व धीर देणे, गरजेनुसार समुपदेशन व त्यानंतर आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष औषधोपचार अशा याच्या पाय-या आहेत. त्यातील भावनिक आधाराच्या टप्प्यावरच अनेक व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे याचसाठी मानस मित्र हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ मानसोपचार तज्ञ आणि महाराष्ट्र अंनिसच्या मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी (जळगांव) हे या प्रकल्पाचे प्रमूख म्हणून काम बघतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८० मानस मित्र / मैत्रिणी या हेल्पलाईनमध्ये काम करतात. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र आणि ठाणे-मुंबई-कोकण अशा पांच विभागात हे काम विभागले आहे. त्या-त्या विभागातील हेल्पलाईनसाठी मानस मित्र / मैत्रिणींचे मोबाईल नंबर समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
-------------------------------

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्य विभाग हा स्वतंत्र विभाग काय करतो. या विभागामार्फत चाळीसगांव येथे गेली १० वर्षे मानसिक आधार केंद्र  चालविले जाते. या ठिकाणी समितीचे प्रशिक्षीत मानसमित्र जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य सेवा देतात. मराठवाड्यातील भूकंपग्रस्त जिल्ह्यांत आणि विदर्भ-मराठवाडा-खान्देशातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाबाबत देखील या स्वरुपाचे मानसिक आधाराचे काम समितीतर्फे चालविले गेले होते. त्याचा खूप चांगला उपयोग झाला होता.
 

Web Title: Corona: Helpline for Emotional Support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.