Join us

झोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 3:25 AM

भाडे थकल्याने घरमालकांची आर्थिक कोंडी

- संदीप शिंदे 

मुंबई : जोगेश्वरीच्या मजासवाडीतल्या १२ झोपड्यांची मालकी असलेल्या इम्तियाज अन्सारींना घरभाड्यापोटी दरमहा ५५ हजार रुपये मिळायचे. परंतु, यापैकी सात कुटुंबे कोरोनाच्या भीतीने गावी परतली असून उर्वरित पाचपैकी तीन कुटुंबांकडे घरभाडे देण्यासाठी दमडीसुद्धा नाही. त्यामुळे इम्तियाज मियाँ चिंताक्रांत आहेत.

कोरोनामुळे भेदरलेल्या आणि रोजगार गमावलेल्या श्रमिकांची मोठ्या प्रमाणात घरवापसी सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्वच झोपडपट्ट्यांमधील भाड्याच्या घरांचे अर्थकारण कोसळू लागले आहे. इम्तियाज मियाँसारख्या चिंताक्रांत मालकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. धारावी, मानखुर्द, गोवंडी, मालवणी, कुर्ला, मालाड, जोगेश्वरी, वाकोला, अंधेरी, सीप्झ या भागांत झोपड्यांचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी कुटुंबे वास्तव्याला आहेत, तर काही ठिकाणी दहा-दहा मजूर दीडशे चौरस फुटांच्या खुराड्यात राहतात. या खोल्यांचे भाडे त्यांच्या आकारमानानुसार दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे. सरकारी, रेल्वे, सीआरझेड आणि वन विभाग यांसारख्या सरकारी जागांवर अतिक्रमण करून उभारलेल्या शेकडो झोपड्या भूमाफियांनी थेट विकल्या आहेत.

घरमालक अस्वस्थ

अनेक कुटुंबे भाडे न देता गावी परतली असली तरी त्यांचे घरातले सामान इथेच आहे. कुलूप तोडून घराचा ताबा घेणे कायदेशीर ठरणार नाही. तसे केले तर भाडेकरू मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. त्यामुळे काही घरमालकही अस्वस्थ असून कायदेशीर मार्गांचा विचार करत असल्याचेही साने यांनी सांगितले. झोपडपट्टीदादा आणि एजंटांचा धंदाही त्यामुळे बसला आहे.

महिन्याकाठी किमान ५० कोटींची उलाढाल ठप्प?

मुंबईतून सुमारे दोन ते अडीच लाख कुटुंबे गावी परत जातील, अशी शक्यता आहे. परप्रांतातलेच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेल्यांचाही त्यात समावेश आहे. यापैकी एक लाख कुटुंबे जरी भाड्याच्या घरात राहतात आणि त्यांचे मासिक भाडे सरासरी पाच हजार रुपये जरी गृहीत धरले तरी महिन्याकाठी किमान ५० कोटींची उलाढाल ठप्प झाली, असे म्हणता येईल. तीन-चार महिने हीच परिस्थिती राहिली तर हा आकडा त्या पटीने वाढेल, असे येथील सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस