Join us

कोरोनामुळे मुंबई दर्शन ठप्प, पर्यटन व्य़वसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:07 AM

मुंबई दर्शनच्या बहुतांश बसेस जागेवरचनिखिल सावंतमुंबई : मुंबईत बाहेरून फिरायला येणाऱ्या पर्य़टकांमध्ये खास स्थान असलेल्या दिवसभराच्या मुंबई ...

मुंबई दर्शनच्या बहुतांश बसेस जागेवरच

निखिल सावंत

मुंबई : मुंबईत बाहेरून फिरायला येणाऱ्या पर्य़टकांमध्ये खास स्थान असलेल्या दिवसभराच्या मुंबई दर्शन टूरला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. हे मुंबई दर्शन जवळपास ठप्प झाले असून टूर गाईड, वाहनचालक यांच्या नोकऱ्यांवर त्यामुळे गदा आली आहे. मुंबई दर्शनच्या सुमारे ८० टक्के बसगाड्या या जागेवरच उभ्या आहेत.

अनलॉक सुरू झाल्यानंतर मुंबईतील बहुतांश व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. लोकल सेवेच्या प्रवासावर मर्यादित वेळेचे बंधन आणि शाळा-महाविद्यालयांचे सुरू असलेले ऑनलाइन वर्ग... या दोन गोष्टी वगळता मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत असल्य़ाचे दिसते आहे. तसे असले तरी पर्यटनाला मात्र अजूनही चालना मिळालेली नाही. मुंबई दर्शनची टूर चालवणाऱ्या विविध कंपन्या आहेत. कोरोना काळात तर ही टूर बंदच होती. निर्बंध शिथिल झाल्यावर या टूर सुरू झाल्या, मात्र त्यांना मोजका प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई दर्शनात ठरलेल्या ठिकाणांपैकी महत्त्वाची ठिकाणे अजूनही बंदच आहेत. मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाला जाता येते. पण दोन-तीन पर्यटकांच्या पलीकडे बुकिंग होत नाही, असे मुंबई दर्शनची सहल आयोजित करणारे अल्ताफ शेख यांनी सांगितले.

व्यवसाय जरासा सुरू होऊ लागला असताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने परत त्याचा फटका बसला आहे. एरवी ४० बसेस मुंबई दर्शनासाठी निघायच्या, आता एकसुद्धा पूर्ण भरत नाही, असेही शेख यांनी सांगितले. कंपनी तोट्यात आहे. त्यामुळे नाइलाजाने बसचालक आणि टूर गाईडही कमी केले असल्याची माहिती शेख यांनी दिली. लोक मुंबईत येण्यास घाबरत आहेत. आता बुकिंग अगदीच कमी असल्याने बसऐवजी छोट्या गाड्यांचा पर्याय घेतला जातो आहे. दररोज अवघ्या १५ ते २० सीट भरतात, अशी माहिती मुंबई दर्शनचे आणखी एक सहल चालक मनोज गुप्ता यांनी दिली.

गेली १८ वर्षे टूर गाईड असलेले राकेश गुप्ता म्हणाले, गेले नऊ महिने मला नोकरी नाही. त्यामुळे घरीच आहे. महिन्याला १५ हजार रुपये मिळत होते. आता मी घर चालवण्यासाठी कांदे-बटाटे विकतो आहे. तीच कथा रघू या बसचालकाची आहे. त्यांची नोकरी गेली असून नऊ महिने घरीच आहे. मिळेल ते काम करतो आणि कसेबसे घर चालवतो, असे रघू यांनी सांगितले.