Join us

कोरोना : झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी रुग्ण तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाची साथ ओसरू लागली असताना एकही पेशंट राहू नये आणि पुन्हा साथीच्या उद्भवाला कारणीभूत ठरू नये यासाठी ...

मुंबई : कोरोनाची साथ ओसरू लागली असताना एकही पेशंट राहू नये आणि पुन्हा साथीच्या उद्भवाला कारणीभूत ठरू नये यासाठी भांडूप पश्चिम भागातील झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असतानाच हातावर पोट असणाऱ्या आणि स्वतःचे घर नसल्याने कामाच्या ठिकाणीच राहणाऱ्या चारशेहून अधिक लोकांना १५ दिवसांतून अधिक काळ तयार जेवण देण्यात आले आहे.

एक टीम लीडर आणि चार कार्यकर्ते अशा पाचजणांचा सहभाग असलेल्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीमकडे, ताप आहे का, हे तपासण्यासाठी थर्मल गन, तसेच ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटर देण्यात आला आहे. वस्तीतील प्रत्येक घरी जाऊन घरात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची या पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. एखादी व्यक्ती तापाने आजारी असल्याचे आढळल्यास त्यांना कोरोना चाचणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. गरज भासल्यास आजारी व्यक्तीला महापालिका वा शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी सहकार्यही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायजरचे वाटप करण्यात येत आहे.

प्रवीण क्रॅस्टो, शुभम पवार, अँथनी दास, धोंडीराज, जमीलभाई यांच्या नेतृत्वाखाली या पाच टीम कार्यरत करण्यात आल्या असून, ईशान्य मुंबई जनता दलातर्फे यासाठी काम करीत आहे. भांडुपमध्ये एकही छुपा रुग्ण राहू नये, ज्यामुळे पुन्हा साथ पसरण्याचा धोका निर्माण होईल, असा या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न असल्याचे संजीवकुमार सदानंद यांनी सांगितले. शिवाय गरजू आणि गरिबांना मदतीचा हात दिला जात आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ हे मदत वाटप सुरू होते. जवळपास दोन हजार कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले.

तर पहिल्या लाटेच्या काळात अडीच हजारांहून अधिक कुटुंबाना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, तसेच सॅनिटाइजर आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेच्या पाच हजारांहून अधिक मास्कचे आतापर्यंत वाटप करण्यात आले. तीनवेळा आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन सार्वजनिक ठिकाणे, चिंचोळ्या गल्या शौचालये अशा ठिकाणी फवारणी करून निर्जंतुकीकरणाचे काम केले.