Join us

कोरोना : गृहनिर्माण सोसायट्यांनी घ्यावयाची खबरदारीची नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 7:42 PM

के पश्चिम वॉर्ड मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्ड सरसावली असून युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असल्याचे चित्र आहे.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड मधील सुमारे 6.5 लाख लोकवस्तीत विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हा भाग मोडतो.येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आढळून आले आहेत. काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण कोरोना रुग्ण 3056 इतके होते,त्यापैकी आतापर्यंत 1716 कोरोना रुग्ण बरे झाले,215 नागरिकांचा मृत्यू झाला. आता काल पर्यंत के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण हे 1125 इतके आहेत अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी लोकमतला दिली.

 के पश्चिम वॉर्ड मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के पश्चिम वॉर्ड सरसावली असून युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असल्याचे चित्र आहे. परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी कोणती उपाययोजना राबवल्या पाहिजे याची माहिती देणारी सविस्तर नोटीस जारी केली आहे. जर सोसायटीत किंवा इमारतीत कोविड रुग्ण किंवा होम क्वारंटाईन रुग्ण असेल तर त्याच्याशी भेदभाव करु नका आणि त्यांचा अपमान करू नका, त्याला चांगली वागणूक देण्यात यावी असे देखिल या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच सोसायटीच्या ज्या सदस्यांना अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जावे लागते त्यांना सोसायटीने कामावर जाण्याची परवानगी देऊन रोज त्यांची सोसायटीने ऑक्सिमीटर,थर्मल डिटेक्टर मार्फत तपासणी करावी अश्या  देखिल महत्वाच्या सूचना या नोटीस मध्ये  विश्वास मोटे यांनी नमूद केल्या आहेत. येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास के पश्चिम वॉर्डच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

या नोटीसमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील जेष्ठ नागरिक व 15 वर्षा खालील मुलांना घरात ठेवा, स्क्रिनिग करण्यासाठी तसेच कोरोनाची लक्षणे आहेत का अशी विचारणा करायला  पालिकेच्या आरोग्य खात्याचे कर्मचारी आपल्या घरी येतील तर त्यांना सहकार्य करा, तसेच जर नागरिकांना सर्दी,खोकला,ताप,अन्न बेचव लागत असेल,श्वासोश्वासाला त्रास होत असेल तर लगेच या वॉर्डच्या वॉर रूमच्या 02226208388 किंवा 02226239166 वर संपर्क साधावा, सोसायटीच्या जागेत जर विलगीकरणाची सुविधा तसेच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा उपलब्ध असेल तर त्याचा सुयोग्य वापर करत असल्याची माहिती या वॉर्डच्या वैद्यकीय अधिक्षकाला देण्यात यावी, गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या संकुलात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिमीटर,थर्मल डिटेक्टर मार्फत तपासणी खाजगी एजन्सी मार्फत करावी तसेच त्यांचे घेतलेले रिडींग 24 तासच ग्राह्य धरण्यात येईल, कोरोना रुग्ण आढल्याने जर इमारत किंवा सोसायटी पालिकेने सील केली असेल तर घरकाम करणाऱ्या महिला,धोबी,भाजी व किराणा माल विक्रेता यांना याठिकाणी प्रवेश निषिद्ध करावा, जर गरज असेल तरच इलेक्ट्रिशियन,प्लंबर,कारपेंटर यांना प्रवेश मर्यादित ठेवावा तसेच इंटरीयर व नवीन कामांना सोसायटीने परवानगी देऊ नये, जर सोसायटी मध्ये डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक राहात असतील त्यांनी सोसायटीच्या नागरिकांना कोविड 19 संदर्भात  कोणती खबरदारी घेतली पाहिजे माहिती द्यावी अश्या अनेक सूचना या नोटीस मध्ये करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या