कोरोनामुळे घरांचे स्वप्न आक्रसले; टू बीएचकेऐवजी वन बीएचकेचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:50 AM2020-08-15T00:50:00+5:302020-08-15T06:55:03+5:30

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील घरांच्या विक्रीत ७० टक्के घट

Corona impacts real estate home sales down by 70 percent in mumbai thane navi mumbai | कोरोनामुळे घरांचे स्वप्न आक्रसले; टू बीएचकेऐवजी वन बीएचकेचा शोध

कोरोनामुळे घरांचे स्वप्न आक्रसले; टू बीएचकेऐवजी वन बीएचकेचा शोध

Next

मुंबई : कोरोनामुळे दाखल झालेल्या आर्थिक संकटाचा विपरीत परिणाम गृह खरेदीवर झाला आहे. कोरोनापूर्व काळात जी कुटुंबे टू बीएचके घरांच्या शोधात होती ती आता वन बीएचके घरांसाठी चौकशी करू लागली आहेत. या कालावधीत घरांची विक्री तब्बल ७० टक्क्यांनी घटली आहे. तर, ग्राहकांच्या प्रतीक्षेतील घरांची संख्याही मोठी असून त्यांच्या विक्रीसाठी किमान अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता सर्वेक्षणाअंती वर्तवण्यात आली आहे.

बांधकाम व्यवसायातील ९९ एकर्स डॉट कॉम या सल्लागार संस्थेने एप्रिल ते जून महिन्यांतील मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील गृहनिर्माण क्षेत्राचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. घर खरेदीसाठी इच्छुक कुटुंबांनी नव्याने शोध सुरू केला असला तरी ती संख्या कोरोनापूर्व काळातील ग्राहक संख्येच्या ५० टक्केच आहे. तसेच जी कुटुंबे पूर्वी टू बीएचकेच्या शोधात होती त्यांनी आपला प्राधान्यक्रम बदलून वन बीएचके घरांचा शोध सुरू केल्याचे हा अहवाल सांगतो. मुलुंड, डोंबिवली, पवई, बोईसर, अंधेरी या भागातील घरांसाठी चौकशी करणारी ६० टक्के कुटुंबे याच श्रेणीतील असून ती ७० ते ८० लाख रुपये किमतीपर्यंतच्या घरांच्या शोधात आहेत. तर, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि दक्षिण मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने त्यांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात नवी मुंबईत ३०० तर ठाण्यात सुमारे ३५० घरांचीच विक्री झाली आहे. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे २५ हजार आणि २७ हजार तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या विक्रीसाठी ३२ ते ३६ महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.

भाडे दरात नगण्य वाढ
अहवालानुसार, मुंबईतील भाडेतत्त्वावरील घरांच्या भाडे दरात फारसा फरक झाला नसला तरी जुहू, घाटकोपर, वांद्रे या ठिकाणी ९ टक्के भाडेवाढ झाली आहे. नवी मुंबईतील उलवे, नेरूळ, सीवूड या भागातील भाडे तीन टक्क्यांनी तर ठाण्याच्या माजिवडा आणि मानपाडा या भागातील घरांचे भाडे चार टक्क्यांनी वाढले आहे.

Web Title: Corona impacts real estate home sales down by 70 percent in mumbai thane navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.