मुंबई/नागपूर: चीन, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली. Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले ४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत दिली.
चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर तात्काळ महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. सदर बैठकीत राज्यात नव्यानं कोविड टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी आपण तयार आहोत का? याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे.
२२०.०३ कोटी डोस-
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात लसीकरण अभियानामधून आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे २२०.०३ कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतात १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. तर ४ मे २०२१ रोजी ही रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१ रोजी या रुग्णसंख्येने ३ कोटींचा आकडा ओलांडला होता. तर २५ जानेवारी २०२२ रोजी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींवर पोहोचली होती.
भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही- डॉ. रवी गोडसे
जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. याशिवाय जपान, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही नागरिकांवर भीतीचं सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असं मत रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"