Join us

कोरोना : वर्क फ्रॉम होम पर्यायांमध्ये वाढ; कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:05 AM

बंगळुरु दूरस्थ काम शोधण्यात आघाडीवर, मुंबई, पुणे खालोखाललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना ...

बंगळुरु दूरस्थ काम शोधण्यात आघाडीवर, मुंबई, पुणे खालोखाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना कंपन्यांनी आवश्यक कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यावर भर दिला आहे; मग अर्जदार कोणत्याही शहरातील असेना. हायब्रिड पद्धत हीच कामाची भविष्यातील पद्धत ठरवून कंपन्या वर्क फ्रॉम होम पर्यायांमध्ये वाढ करतील, असे अपेक्षित असल्याचे जगातील अव्वल क्रमांकाच्या जॉब साईटकडील माहितीत नमूद करण्यात आले आहे. तर एप्रिल २०२१ मध्ये मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दूरस्थ कामाच्या शोधाने तब्बल ९६६ टक्के अशी उसळी मारली आहे.

कंपन्या कर्मचारी घेताना आणि इच्छुक उमेदवार संधींचा शोध घेत असताना भौगोलिक सीमारेषा धूसर होत आहेत. या स्थितीची दूरस्थ नोकरीच्या मागणीला जोड मिळाली आहे. आता उमेदवार कुठल्या भागात आहे हा मुद्दा गौण ठरवत त्यांच्यातील कौशल्यांना प्राधान्यक्रम दिले जात आहे. असून, दर दोनपैकी एक कंपनी व्हर्च्युअलीच कर्मचाऱ्यांना सेवेत घेत आहे. शिवाय ६० ते ६४, १५ ते १९, ४० ते ४४ अशा वयोगटांमध्ये दूरस्थ काम शोधण्याचे प्रमाण प्रत्येकी १३ टक्के आहे. ३५ ते ३९ आणि २० ते २४ या वयोगटात हे प्रमाण १२ टक्के आहे. १६ टक्क्यांसह बंगळुरु दूरस्थ काम शोधण्यात आघाडीवर आहे. दिल्ली ११ टक्के, मुंबई ८ टक्के, हैदराबाद ६ टक्के आणि पुणे ७ टक्के असे हे प्रमाण आहे.

----------------

व्यवसाय आता डिजिटल

व्यवसाय आता डिजिटल स्वरूपात बदलत असताना कर्मचारी आणि कंपन्यांसाठी कुठूनही काम करणे ही सामान्य स्थिती झाली आहे. तंत्रज्ञानामुळे शक्य झालेल्या या बदलांमुळे अधिकाधिक कंपन्या भविष्यात हायब्रिड पद्धती स्वीकारतील.

----------------

तांत्रिक तज्ज्ञता असलेल्या कामांना मागणी

- टेक्निकल सपोर्ट स्पेशालिस्ट

- डेटा एंट्री क्लर्क

- आयटी रीक्रूटर

- कंटेंट रायटर

- बॅक ॲण्ड डेव्हलपर