मुंबई : देशाचे रक्षण करण्यासाठी चौवीस तास डोळ्यात तेल घालून समुद्रात कार्यरत राहणाऱ्या भारतीय नौदलाच्या एकवीस जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या आयएनएस आंग्रे द्वारे लॉजिस्टिक व प्रशासकीय सेवा पुरवली जाते. तेथे प्रशासकीय विभागात कार्यरत असलेल्या एका जवानाला सात एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्यांना कॉरंन्टाइन करण्यात आले होते व त्यांची तपासण करण्यात आली. त्यामध्ये वीस जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व जवानांवर नौदलाच्या कुलाबा येथील आयएनएस अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आयएनएस आंग्रे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. इतर जवानांची देखील तपासणी सुरु असून त्यांचे अहवाल लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती नौदलाचे जनसंपर्क अधिकारी कमांडर मेहुल कर्णिक यांनी दिली. आयएनएस आंग्रे शोअर सपोर्ट एस्टँब्लिशमेंट आहे. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयातील सर्व शोअर एस्टँब्लिशमेंट व सर्व प्रशासकीय कामे आंग्रे येथून केली जातात. त्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंग्रे येथील एकाच ब्लॉकमधील जवानांना ही लागण झाली असून तेथे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोविड 19 च्या प्रक्रियेप्रमाणे सर्व काळजी घेण्यात येत आहे. सुदैवाची बाब म्हणजे, नौदलाच्या कोणत्याही युध्द नौका व पाणबुडीवरील जवान, अधिकाऱ्यांना अद्याप कोरोनोची लागण झालेले उदाहरण समोर आलेले नाही. कोरोनाची लागण झालेल्या या जवानांमध्ये बहुसंख्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.