Join us  

समाजापासून लपवलेले दुसरे लग्न कोरोनामुळे समोर आल्याने कोरोना बाधित तरुणाची कुचंबणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 3:48 PM

संकट इतक्यावरच थांबले नाही तर त्याच्या आयुष्यातील इतकी वर्षे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवारापासून लपवून ठेवलेली  घटना कोरोनाच्या माध्यमातून जगासमोर आली आहे.

खलील गिरकर

मुंबई  : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढू लागले आहे. मात्र या गंभीर समस्येतही काही गमतीदार प्रसंग समोर येऊ लागले आहेत.एका ठिकाणी एका रुग्णाच्या संपर्कातील रुग्णालयाच्या तरुण कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये व मित्रपरिवारामध्ये दुःखाचे वातावरण होते.  मात्र त्याचे संकट इतक्यावरच थांबले नाही तर त्याच्या आयुष्यातील इतकी वर्षे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवारापासून लपवून ठेवलेली  घटना कोरोनाच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता तोंड लपवण्याची वेळ आली आहे. 

त्याचे झाले असे की, नुकतेच एका रुग्णालयातील प्रशासकीय काम पाहणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याच्या इतर कुटुंबियांची देखील तपासणी करण्यात आली.सुदैवाने त्याच्या पत्नी, मुलीसहित घरातील इतरांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबियांनी व प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला. मात्र दोन दिवसांनंतर दुसऱ्या प्रभागातील एका महिलेला  कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्या महिलेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी दुर्दैवाने महिलेला कोरोना  झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाची पूर्ण माहिती घेतली जात असल्याने व त्या महिलेने गेल्या पंधरा दिवसांत कुठे प्रवास केला, कुणाची भेट घेतली, असे विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिलेचे त्या रुग्णासोबत नाते असल्याचे समोर आले.

रुग्णालयातील प्रशासकीय काम पाहणाऱ्या त्या तरुणाला ही महिला अनेकदा भेटल्याचे व तो तरुण त्या महिलेच्या घरी जात येत असल्याचे समोर आले. त्यावर अधिक विचारणा केल्यावर महिलेने तो तरुण आपला पती असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या तरुणाकडूनच त्या महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. यामध्ये त्या तरुणाची कुचंबणा झाली आहे. सांगता पण येत नाही अन सहनही होत नाही अशी त्याची अवस्था झाली आहे.  एकीकडे त्याच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना इतकेच काय मित्रांना देखील त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत माहिती नव्हती. इतकी वर्षे कसोशीने लपवलेले हे प्रकरण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगासमोर आल्याने त्यामुळे संबंधित तरुणाची कोरोनाचे उपचार घेत असताना देखील झोप उडाली आहे.

कोरोनातून बरा झाल्यावर रुग्णालयातून घरी आल्यावर पहिल्या पत्नीला व कुटुंबियांना याबाबत काय उत्तर द्यावे असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. मित्रांना देखील त्याबाबत फारशी माहिती नसल्याने मित्र देखील आता त्याची मजा घेऊ लागले आहेत. कोरोना हा गंभीर रोग असल्याचे आरोग्य विभाग घसा ओरडून सांगत असताना सर्वसामान्य नागरिकांकडून त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन असताना देखील रस्त्यावर मोठ्या संख्येने नागरिक विविध कारणांचा आधार घेऊन येत असल्याने पोलिस यंत्रणेवरील ताणात देखील वाढ झाली आहे.समाजापासून इतकी वर्षे यशस्वीपणे लपवून ठेवलेले असे प्रसंग आता कोरोना झाल्यामुळे समोर येऊ लागले आहेत त्यामुळे तरी नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, असा मिश्किल सल्ला एका पोलिस अधिकाऱ्याने दिला आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस