३,६९७ सक्रिय रुग्ण; ४७१ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्याच्या प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या सुमारे ४५ हजारांहून अधिक पाेलिसांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी सध्या ३,६९७ सक्रिय रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. ४० हजार ३०३ काेराेनामुक्त झाले असून एकूण ४७१ जणांना प्राण गमवावा लागला.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये काेराेनाबाधित पाेलिसांचे प्रमाण वाढत असल्याने योग्य काळजी घेण्याचे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले आहे. गेल्या वर्षभराच्या काळात आरोग्यसेवकांबरोबर पोलीस हा घटक कोरोनाविरुद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरला आहे. मात्र त्यामध्ये अनेक पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना त्याची लागण झाली असून अनेकजण दगावले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेक पोलिसांना या विषाणूने पकडले असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात १४ एप्रिलपर्यंत एकूण ४४ हजार ८४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील ८,१२० तर उर्वरित पोलीस घटकांतील ३६,७२८ जणांचा समावेश आहे. त्यापैकी ४० हजार ३०३ जण काेराेनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ४२६ इतकी आहे. या रोगाचा प्रतिकार करत असताना मुंबईतील १०१ अधिकारी, अंमलदार तर राज्यातील उर्वरित पोलीस घटकांतील ३२ अधिकारी व ३३८ अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. एकूण मरण पावलेल्यांची संख्या ४७१ इतकी आहे. त्याशिवाय सध्या राज्यात एकूण १० हजार ६०३ पोलीस होमक्वारंटाईन आहेत. त्यामध्ये मुंबईतील २९९ अधिकारी-अंमलदाराचा समावेश आहे.
* ८१ टक्के पोलिसांनी घेतला लसीचा पहिला डोस
कोरोनावरील प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम पोलिसांना दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास ८१ टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर २८ दिवसानंतर घ्यावयाच्या दुसऱ्या डोसचे प्रमाण जेमतेम ४० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
* प्रतिबंधात्मक लस घ्यावी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य दक्षता बाळगून कार्यरत रहावे. जेणेकरून त्यांना व त्यांच्यामुळे कुटुंबीयांना त्याची लागण होऊ नये, याची काळजी घ्यावी. प्रतिबंधक लस तातडीने घ्यावी ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल.
- संजय पांडे (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र)
-------------------------------