जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षातून चीनला क्लीन चिट
बीजिंग : चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून नव्हे, तर वटवाघळे किंवा प्राण्यांच्या गोठवलेल्या मांसातून कोरोना पसरल्याच्या शक्यतेवर जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे जगभर हा विषाणू पसरवल्याच्या आरोपातून चीनला जवळपास क्लीन चिट मिळाल्याचे मानले जाते. हा अहवाल लवकरच अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे.
गेल्या वर्षी या विषाणूचा संसर्ग झाला. मात्र, तो वुहानमधील चीनच्या प्रयोगशाळेतून किंवा तेथील गळतीतून झालेला नाही, असा निर्वाळा आरोग्य संघटनेने तेथील पाहणी, चीनने सादर केलेले पुरावे आणि तेथील परिस्थितीजन्य माहितीनंतर दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनसोबत संयुक्त अभ्यास करून हे संशोधन केले आहे. मात्र, हा प्रसार चीनमध्येच का झाला, अन्य देशांतील वटवाघळे किंवा प्राण्यांतून का नाही, याचे उत्तर या अहवालात नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अहवाल जाहीर झाल्यानंतर चीनला क्लीन चिट मिळेल, परंतु हा संसर्ग कसा झाला त्याचे ठोस उत्तर मिळण्याची शक्यता जवळपास कमी आहे.
या अभ्यास गटाने विषाणूच्या प्रयोगशाळेतील गळतीचे गृहीतक वगळून विषाणूच्या प्रसाराबाबतच्या अन्य शक्यतांवरच संशोधन केल्याचे वृत्तसंस्थेच्या हाती आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या प्रकाशनास वारंवार विलंब झाला आहे. आता मात्र तो लवकरच प्रसारित होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
हा अहवाल मुख्यत्वे जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वुहानला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिलेल्या भेटीवर आधारित आहे. वुहान मोहिमेचे नेतृत्व करणारे जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी सांगितले की, या अहवालाला अंतिम स्वरूप आले असून, त्याची सत्यता पडताळणी आणि भाषांतर केले जात आहे. येत्या काही दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि आम्ही हा अहवाल जाहीर करू, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
खवले मांजरातही
सापडला विषाणू
यापूर्वी प्राण्यांमधून पसरलेल्या सार्सनंतर कोरोनाचे विषाणू तयार होण्यास प्रदीर्घ काळ लागला असून, त्याच्या उत्क्रांतीचा प्रवासही यात मांडण्यात आला आहे. हे अंतर कित्येक दशकांचे असावे, असा अंदाज अहवालात आहे. अशाच प्रकारचे विषाणू खवले मांजरातही आढळले आहेत. मांजरीमुळेही कोविडची लागण होण्याची शक्यता मांडण्यात आली आहे.