Join us

कोरोना संसर्ग वाढताच एस. टी.कडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:07 AM

कोरोना संसर्ग वाढताच एस. टी.कडे प्रवाशांची पाठप्रवासी संख्येत १३ लाखांची घट; उत्पन्न झाले चार कोटींनी कमीलोकमत न्यूज ...

कोरोना संसर्ग वाढताच एस. टी.कडे प्रवाशांची पाठ

प्रवासी संख्येत १३ लाखांची घट; उत्पन्न झाले चार कोटींनी कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात वाढलेले कोरोना रुग्ण, विविध जिल्ह्यांमध्ये लागू झालेले लॉकडाऊन आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे एस. टी.च्या प्रवासी संख्येत तब्बल १३ लाखांची घट नोंदविण्यात आली आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एस. टी.ला ओळखले जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी प्रवासासाठी एस. टी.वरच अवलंबून आहेत. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एस. टी. गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यानुसार लॉकडाऊन आणि प्रवासी निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम एस. टी. सेवेवर झाला आहे.

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी राज्यातील एस. टी. प्रवाशांची संख्या ३३ लाख होती. महिनाअखेर अर्थात २८ फेब्रुवारीला यात घट होऊन ती २० लाखांपर्यंत पोहोचली. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रोजची सरासरी प्रवासी संख्या २९ लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र, शेवटच्या आठवड्यात ती सरासरी २५ लाखांपर्यंत घसरली.

प्रवासी संख्येत घट झाल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीच्या कमाईवरही पाणी सोडावे लागले. १५ फेब्रुवारीला १६ कोटी उत्पन्न कमावलेल्या महामंडळाला सध्या सरासरी १२ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. काेरोना काळातील लॉकडाऊनमुळे एस. टी. सेवा ठप्प असल्याने एस. टी.चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. ही मदत आणि उत्पन्न यातून पगार करण्यात येत असल्याचे एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.