मुंबई : अनलॉकच्या काळात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरात गेल्या २४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून ७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत पोलिसांचा आकड़ा १७३ वर गेला आहे.
राज्यभरात १ हजार ८१८ पोलीस अधिकाऱ्यांसह १५हजार ९४ पोलीस कर्मचारी असे एकूण १६ हजार ९१२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तर यापैकी १४२१ पोलीस अधिकारी आणि १२२९८ पोलीस कर्मचारी असे एकूण १३ हजार ७१९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ हजार २० पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यात, धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत यात ५११ पोलिसांची भर पडली. आतापर्यंत दिवसाला तीनशे ते चारशेचा पल्ला गाठणाऱ्या कोरोनाबाधित पोलिसांच्या आकडयाने पाचशेचा आकड़ा पार केल्याने पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची भिती वाढताना दिसत आहे. तर ७ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यात, मुंबई, नवी मुंबई, नागपुर ग्रामीण, कोल्हापुर आणि सातारा मध्ये प्रत्येकी १ तर नागपुर शहर मधील २ पोलिसांचा समावेश आहे.
मुंबई ते राज्यभर - सुरूवातीला मुंबई पोलीस दलात कोरोनामुळे दहशत निर्माण झाली होती. मात्र मुंबईतील लाट कमी होत, राज्यभरात याचे प्रमाण वाढत आहे. जून पासून सुरु झालेल्या अनलॉकच्या टप्प्यामुळे राहदारी वाढली. याचाच सर्वाधिक फटका पोलिसांना बसताना दिसत आहे.
६ दिवसांत १७ पोलिसांचा मृत्यू - जून , जुलै, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतच कोरोनामुळे १७ पोलिसांना जीव गमवावा लागला. तर १६१८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.