घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:11 AM2022-01-20T07:11:07+5:302022-01-20T07:11:31+5:30

१५ जानेवारीपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबईत ८४,३५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी सात टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

Corona is in control mumbai municipal corporation to mumbai high court | घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

googlenewsNext

मुंबई : मुंबई महापालिका व आजूबाजूच्या पालिकांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे, अशी महिती पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. 

१५ जानेवारीपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबईत ८४,३५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी सात टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. तर तीन टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली आणि ०.७ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर लागले, अशी माहिती साखरे यांनी दिली.

साखरे यांनी पालिकेच्यावतीने तपशिलात माहिती सादर केली. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा, सक्रिय रुग्ण, औषधांचा पुरवठा, रुग्णालयातील उपलब्ध खाटा इत्यादींची माहिती देण्यात आली. आमच्याकडे पुरेशा खाटा, औषध आणि ऑक्सिजन उपलब्ध आहे. 

कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, असे पालिका म्हणत आहे का? असा सवाल न्यायालयाने पालिकेला करताच साखरे यांनी त्याबाबत सकारात्मक उत्तर दिले. हो, परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाच्या केसेस कमी होत आहेत. ६ जानेवारी ते ९ जानेवारीपर्यंत दरदिवशी कोरोनाच्या केसेस २० हजार इतक्या होत्या. मात्र, १५ जानेवारीला हे प्रमाण १० हजार इतके  झाले आणि गेले तीन दिवस दरदिवशी ७ हजार केसेस सापडत आहेत, अशी माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली. 

महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
सुविधांबाबत अहवाल सादर करा : राज्य सरकारने राज्यातील सक्रिय रुग्ण आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत न्यायालयात अहवाल सादर करावा, ही याचिककर्त्यांची विनंती मान्य करत न्यायालयाने राज्य सरकारला २५ जानेवारी रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

Web Title: Corona is in control mumbai municipal corporation to mumbai high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.