Join us  

कोरोना वाढतोय! मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 6:08 AM

९२६ कोरोनाबाधितांची नोंद; तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. शहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहर, उपनगरात ६ हजार ९८८ नागरिक गृहविलगीकरणात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. याखेरीज, शहरातील १ हजार ३६७ सक्रिय रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्ण लक्षणविरहित असल्याचे निरीक्षण आहे. सध्या मुंबईतील पाच कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत १ हजार १४८ रुग्ण लक्षणविरहित आहेत, तर केवळ ९१ रुग्णांमध्ये सौम्य, तीव्र आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तसेच, शहर, उपनगरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर सध्या ६.१६ टक्के आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कोविडमुळे मुंबईत आतापर्यंत १९ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे, यातील १६ हजार ९२० रुग्ण ५० वयोगटापुढील आहेत.

‘या’ विभागांत सर्वाधिक रुग्ण

  • के पश्चिम/अंधेरी     २१४ 
  • एच डब्ल्यू/वांद्रे        १०९ 
  • के पूर्व/विलेपार्ले         ८३

९२६ कोरोनाबाधितांची नोंद; तिघांचा मृत्यू

  • राज्यात शुक्रवारी ९२६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  • राज्यातील उपचाराधीन कोरोना रुग्णांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला असून, सद्य:स्थितीत ४ हजार ४८७ रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत.
  • मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ३६७ आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पटीचा काळ ४ हजार ६४२ दिवसांवर आला आहे. मुंबईत दिवसभरात २७६ बाधितांची नोंद झाली असून त्यातील २५३ रुग्ण लक्षणेविरहित आहे. 
  • दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद आहे. शुक्रवारी २३ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यातील सात रुग्ण आ’क्सिजनवर उपचार घेत आहेत. ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान कोविड वाढीचा दर ०.०१४७ टक्के आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

लसीकरण पूर्ण करा

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी किंवा संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांनी दुसऱ्या डोस घेतला नाही किंवा वर्धक मात्रेकडे दुर्लक्ष केले आहे, त्यांनी प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे, आता कोविड वॉररूमकडून लसीकरणाबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या जनुकीय बदलांमुळे संसर्गाची गती अधिक असल्याने लसीकरण त्यावर प्रभावी उपाय आहे. - डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग (पालिका)

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई