लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, दुसरीकडे आरोग्य विभागाकडून वेळोवेळी आवाहन करूनही दैनंदिन लसीकरणाविषयी मुंबईकरांमध्ये बेफिकीर दिसून येत आहे. दिवसभरात लस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण १०० ते १५० च्या घरातही नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, राज्यातील कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १,०८९,३,४५८ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतली आहे, तर ९,८१४,८२९ लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे, तर अवघ्या १,४८७,९०९ लाभार्थ्यांनीच बूस्टर मात्रा घेतली आहे. सध्या शहर, उपनगरात सक्रिय असणाऱ्या १ हजार २१ कोरोना रुग्णांपैकी ७८६ लक्षणविरहित आहेत, तर ५७ रुग्णांना सौम्य, तीव्र आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज होत असल्या तरीही सामान्यांनीही लसीकरणावर अधिक भर दिला पाहिजे, लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. शिवाय, अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी तर प्राधान्याने लस घ्यायला हवी, असे राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती सातत्याने प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र, मुंबईकर त्याला दाद देत नाही असे सध्याचे चित्र आहे.