कोरोना : आपले काम असेच चालू ठेवा. मात्र आवश्यक सुरक्षा बाळगा. कुटुंबाच्या संपर्कात रहा त्यांची काळजी घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या करोना संकटाचा संपूर्ण देशात प्रतिकार करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी इ एच व्ही हा अतिउच्चस्तराचा वीजपुरवठा सुरळीत ठेवत कंपनीने तिची जबाबदारी उचलली आहे. आज रुग्णालये, पोलीस व प्रशासकीय कार्यालये, प्रयोग शाळा, प्रसार माध्यमांची कार्यालये रक्तदान केंद्रे या ठिकाणी अखंड वीजपुरवठा लागतो व त्यातील आपली जबाबदारी आपण पार पाडीत आहोत. आपले काम असेच चालू ठेवा. मात्र आवश्यक सुरक्षा बाळगा. कुटुंबाच्या संपर्कात रहा त्यांची काळजी घ्यावी, असे म्हणत महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी कामगारांना धीर दिला आहे.
महापारेषणमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांना दिनेश वाघमारे यांनी पत्र लिहले आहे. या पत्रात दिनेश वाघमारे म्हणतात, आपणासोबत संवाद साधताना माझे मन आपल्याविषयीच्या अभिमानाने भरून आले आहे. आज आपला देश करोना या भीषण आजाराशी लढत आहे. आणि आपण सर्व कामावर हजर राहून आपल्या जीवाची पर्वा न करता, धोके पत्करुन राज्याचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहात हे पाहून मला खूप अभिमान वाटतो. आपले या परिस्थितीत मोठे योगदान आहे. ऊर्जा मंत्री यांनी त्याची स्तुती केली आहे. हे केवळ तुम्हा कर्मचार्यांच्या सतत उपस्थित राहून धोके पत्करुन कामे करण्याच्या वृत्तीमुळे शक्य होत आहे. या जीवघेण्या परिस्थितीत उंच मनोरे व खांबावर चढून जाणे, संपूर्ण वीज जाळ्याच यंत्रणा, वीज भार प्रेषण केंद्र व इतर वीज ग्रहण केंद्रे, सब स्टेशन्स, भांडारे इतर कार्यालये दक्ष व सेवेसाठी तत्पर ठेवणे, कर्मचार्यांच्या समस्यावर जागरूक रहाणे, मंत्रालय पोलीस व प्रसार माध्यमे आदि याच्याशी संपर्क साधून समन्वय साधणे यासाठी सर्व विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आपल्या मेहनतीची प्रशंसा करण्यात शब्द अपूरे पडत आहेत. आपले काम असेच चालू ठेवा. मात्र आवश्यक सुरक्षा बाळगा. आपल्या कुटुंबाच्या संपर्कात रहा त्यांची काळजी घ्यावी. आपल्या परिश्रमाने या परिस्थितून आपण बाहेर पडू व महापारेषण कंपनीचे नाव व प्रतिमा अधिक चांगली उज्ज्वल करु याचा मला विश्वास आहे.